काही दिवसांपूर्वी टॉपलेस फोटोशूट केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अॅमी जॅक्सन आई झाली आहे. अॅमीने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली. विशेष म्हणजे तिने या फोटोला जे कॅप्शन दिलं आहे ते साऱ्याचं लक्ष वेधून घेत आहे.
‘या जगामध्ये तुझं स्वागत आहे..आंद्रेस..’ असं म्हणत अॅमीने तिच्या बाळाचं स्वागत केलं. सोबतच त्याचं नावही जाहीर केलं. शेअर करण्यात आलेला हा फोटो रुग्णालयातील असून तिच्या चेहऱ्यावर आई झाल्याचा आनंद पूर्णपणे झळकत आहे.
अॅमीने जानेवारी महिन्यात अब्जाधीश जॉर्ज पानायिटूसोबत साखरपुडा केला होता. जॉर्ज ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्रस पानायिटूचा मुलगा आहे. त्याचबरोबर हिल्टॉन, डबल ट्री, पार्क प्लाझा यासारखी अनेक आलिशान हॉटेल्स जॉर्जच्या मालकीची आहेत. दरम्यान, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘2.0’, ‘I’ अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकलेली अॅमीने मॉडेलिंगपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने फार कमी वेळातच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तिने केवळ हिंदीच नाही तर, अन्य भाषांमधील चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.