हॉलिवूडच्या गाजलेल्या ‘२४’ या मालिकेचे हक्क अभिनेता अनिल कपूरने विकत घेतले आहेत. आता या मालिकेचा भारतीय अवतार त्याच नावाने कलर्स वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने बॉलिवूडचे अनेक नामी कलावंत छोटय़ा पडद्यावर एकत्र येणार आहेत. छोटा पडदा आणि मोठा पडदा असा फरक आता राहिलेला नसला तरी छोटय़ा पडद्यावर मोठे मानधन घेतल्याशिवाय बॉलिवूडचे कलाकार मालिकांसाठी काम करत नाहीत. मात्र, अनिल क पूरची मालिका त्याला अपवाद ठरली असून हिंदी चित्रपटातील काही जुने चेहरेही या मालिकेतून पहायला मिळणार आहेत.
हॉलिवूडच्या ‘२४’ या मालिकेत स्वत: अनिल कपूरने ओमार हसनची भूमिका केली होती. मात्र, भारतीय अवतारातील मालिकेत त्याने दहतवादविरोधी पथकाच्या प्रमुखाची भूमिका साकारली असून जयसिंग राठोड असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. या शोच्या निमित्ताने अनिल कपूर पहिल्यांदाच भारतीय टेलिविश्वात प्रवेश करतो आहे. निर्माता आणि कलाकार अशा दोन्ही भूमिकांमधून तो पहिल्यांदाच छोटय़ा पडद्यावर दिसणार आहे. त्याने स्वत:बरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नावाजलेल्या चेहऱ्यांना या मालिकेत सामील करुन घेतले आहे. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते अनुपम खेर यांचे. अनुपम खेर यांनी याआधी मुलांसाठी एक शो केला होता. मात्र, त्यानंतर मालिकेत भूमिका करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अनुपम खेर यांच्याबरोबरच शबाना आझमीही पहिल्यांदाच मालिकेत दिसणार आहे तेही दहशतवादी, गुप्तहेर, पोलिस यांच्या साहसी कथांवर आधारित मालिकेत शबाना पहिल्यांदाच काम करणार आहे. याशिवाय, अभिनेता राहुल खन्नासाठी मूळ मालिकेतील तीन-चार व्यक्तिरेखांचा एकत्रित अभ्यास करून खास व्यक्तिरेखा तयार करण्यात आली आहे. चित्रपटांपासून बरेच दिवस दूर राहिेलेल्या राहुलला छोटय़ा पडद्यावर बघणे हा वेगळा अनुभव ठरणार आहे.
‘२४’ मालिकेत आणखी एका नावाने लक्ष वेधून घेतले आहे ते हिंदी चित्रपटसृष्टीची सध्या विस्मृतीत गेलेली नायिका अनिता राज. अनिता राज बऱ्याच वर्षांनंतर प्रेक्षकांना दिसणार आहे. एवढया मोठय़ा प्रमाणावर चित्रपट कलाकारांना एकत्र आणणारा हा एकमेव शो ठरला आहे. महत्वाचे म्हणजे एकाचवेळी ‘केबीसी’मुळे अमिताभ बच्चन, ‘बिग बॉस’मुळे सलमान खान, ‘झलक दिखला जा’मुळे माधुरी दीक्षित आणि आता ‘२४’ मालिकेतून दिसणारे हे हिंदीचे चेहरे पाहता छोटा पडदा हा या बॉलिवूड कलाकारांनीच व्यापून टाकल्याचे चित्र दिसणार आहे.