विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत सर्वात जास्त वेळ व्यतीत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हे दोघेही उत्तराखंडला रवाना झाले होते. विराट आणि अनुष्का हे दोघेही सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच सोशल मीडियावरही त्यांचे फोटो चांगलेच गाजत होते. जवळपास आठवडाभराच्या सुट्टीनंतर हे दोघे ज्यावेळी परतले त्यावेळीसुद्धा विमानतळावर या दोघांनाही एकत्र पाहण्यात आले होते. पण, विराट-अनुष्काच्या परतीच्या प्रवासात जो काही किस्सा घडला त्याने अनेकांचेच लक्ष वेधले.
२०१६ च्या वर्षाला निरोप देत असताना सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या काही विषयांपैकी एक म्हणजे विराट-अनुष्काचा उत्तराखंड दौरा. याच दौऱ्यावरुन परतत असताना अनुष्का तिची बॅग विमानातच विसरली, असे वृत्त फिल्मफेअरने प्रसिद्ध केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘अनुष्का आणि विराट ऐकमेकांशी बोलण्यात व्यग्र होते. त्यामुळे अनुष्का विमानातच तिची बॅग विसरल्याचे तिच्या लक्षातही आले नाही. काही वेळाने जेव्हा तिला बॅग हरवल्याचे लक्षात आले त्यावेळी अनुष्काने तिच्या कर्मचाऱ्यांना बॅग परत आणण्यास सांगितले आणि सरतेशेवटी तिला बॅग परत मिळाली’. त्यामुळे आता विराटच्या नादात अनुष्का स्वत:ची बॅगही विसरली असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, विराट आणि अनुष्का उत्तराखंडमध्येच साखरपुडाही करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण या सर्व चर्चांच्या वादळाला शमवत विराटने एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, ‘आमचा साखरपुड्याचा करण्याचा विचार नाही आणि जर आम्ही तसे करणार असू तर ते लपविण्याचे काही कारण नाही’. विरटने हे असे ट्विट केले असले तरीही या जोडीच्या चाहत्यांमध्ये मात्र ‘विरुष्का’ म्हणजेच विराट आणि अनुष्काच्या नात्याविषयी फारच उत्सुकता पाहायला मिळत आहे.