बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता अनुपम खेर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते सतत वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो फॅन्ससोबत शेअर करत असतात. अनुपम आणि त्यांची आई दुलारी यांचे खूप छान बॉंडिंग आहे. ते अनेकदा आईसोबत व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच अनुपम यांनी आईसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांची आई…सून किरण खेर यांची चौकशी करताना दिसत आहे.
अनुपम यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात कॅप्शन मध्ये लिहिले, “आज आई एका मॉडेलप्रमाणे चालली. दुलारीला अमेरिकेतून आणलेली नवीन बॅग खूप आवडली. परंतु त्यात ५०० रुपये ठेवले होते ते तिला पटले नाही. जेव्हा मी तिला बॅग घेऊन, मॉडेलप्रमाणे चालायला सांगितले तेव्हा ती नुसती चालली नाही. तर अभिनय देखील करुन दाखवला, ती किती फेमस आहे हे तिला ठाऊक नाही. ती इतकी लोकप्रिय आहे की तिने मास्क लावला तरी तिला लोक ओळखतील आणि आता मास्क लावणं हा जिवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.” या व्हिडीओच्या शेवटी अनुपम यांची आई सगळ्यांची विचारपूस करताना दिसत आहेत. या वेळी ‘किरण कशी आहे’ हे देखील विचारताना दिसल्या आहेत.
अनुपम यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खेर सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात अनुपम खेर यांनी एक ट्वीट करत किरण खेर यांना कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. जवळपास ६ महिन्यापासून किरण खेर या मल्टीपल मायलोमा या आजाराचा सामना करत आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या आधी अनुपम खेर यांनी किरण खेर यांची प्रकृती आता ठीक असल्याचं सांगितलं होतं.