छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध हिंदी मालिका अनुपमा ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अनघा भोसले हिने सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे अनुपमा मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी अनघा आता यापुढे प्रेक्षकांना पडद्यावर दिसणार नाही.

अनघा भोसले ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच अनघाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने सिनेसृष्टी कायमची सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. यासोबत तिने हा निर्णय का घेतला याबाबतची माहितीही दिली आहे. अनघाने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

अनघा भोसले नेमकं काय म्हणाली?

“हरे कृष्ण. मला माहीत आहे की, मी शोमध्ये का येत नाही याची तुम्हा सर्वांना काळजी वाटत आहे. पण तुम्ही सर्वांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे सर्वांचे आभार. पण ज्यांना अजून माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छिते की मी अधिकृतपणे चित्रपट आणि टीव्ही क्षेत्राला रामराम केला आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या या निर्णयाचा आदर करावा आणि मला पाठिंबा द्यावा अशी माझी इच्छा आहे. अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.”

“आपण सर्व देवाची मुले आहोत यावर माझा विश्वास आहे. आपल्या सर्वांची इच्छा एकच आहे, पण फक्त मार्ग वेगळे आहेत. आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. देव माझ्यासाठी नेहमीच दयाळू होता. ज्या उद्देशाने आपण सर्वजण या जीवनात आलो आहोत तो उद्देश पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी त्याची इच्छा आणि प्रेम जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला जर काही उत्तर हवे असेल तर तुम्ही ते भगवद्गीतेद्वारे मिळवू शकता. जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील नवीन टप्प्यांबद्दल नेहमीच अपडेट देत राहीन. मी सर्व धर्म आणि सर्वांच्या प्रवासाचा आदर करते”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

यापूर्वी एका मुलाखतीत अनघाने ती या मालिकेतून आणि अभिनयातून ब्रेक घेतल्याचे म्हटले होते. मात्र आता तिने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री कायमची सोडत असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अनघाने दादी अम्मा… दादी अम्मा मान जाओ या टीव्ही मालिकेतील सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यात तिने श्रद्धा झावर हे पात्र साकारले होते. तिने अनुपमा या प्रसिद्ध मालिकेत नंदिनीची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती खरी प्रसिद्धीझोतात आली.