निलेश अडसूळ

नाटक, मालिका आणि चित्रपटातून एक गोजिरी अभिनेत्री प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. त्यांच्या प्रत्येक कामाची चर्चा केवळ मराठीत नाही तर हिंदीतही होते. ‘या सुखांनो  या’ मालिकेतील हळवी भूमिका ते ‘लेक माझी लाडकी’ मालिकेतून दिसलेली  नकारी छटा असलेली भूमिका, या सर्व प्रवासात त्यांच्या भूमिका कायम लक्षात राहिल्या. अर्थात नाटक आणि सिनेमांपेक्षा त्यांनी मालिकेतून अधिक काळ काम केल्याने महाराष्ट्रातील तमाम गृहिणी वर्गाच्या त्या लाडक्या ठरल्या. आता त्या म्हणजे अर्थातच सध्या ज्यांची चर्चा आहे त्या पेशवाईतील गोपिकाबाई साकारणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

पेशवाईतील ‘रमा-माधवा’ची गोष्ट आता ‘कलर्स मराठी’च्या ‘स्वामिनी’ मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेतून इतिहासाची पाने उलगडली जाणार आहेत. सध्या प्रोमोमध्ये आपल्या पेशवाईचा आदब मिरवणाऱ्या गोपिकाबाई कधी एकदा मालिकेतून पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या निमित्ताने गोपिकाबाईंशी म्हणजेच ऐश्वर्या नारकरांशी मारलेल्या या खास गप्पा.

‘स्वामिनी’ मालिकेविषयी त्या सांगतात, पेशवाईच्या इतिहासात ‘रमा-माधव’  यांच्या जोडीतील प्रेम काहीसे निराळे आहे. त्यांच्या वयात असणारे अंतर, अल्लड  वयातील विवाह या दोन गोष्टी पडद्यावर येताना प्रेक्षक नक्कीच त्यात रमतील. पेशवाई टिकवण्यासाठी ज्या पद्धतीने राजकारण सुरू होते तसेच काहीसे राजकारण घरातील चुलीपुढे घडत होते. आणि त्याच्या सूत्रधार असलेल्या गोपिकाबाई ज्या पद्धतीने सर्व हाताळत होत्या. त्यांचा तो स्वभाव, बुद्धीचातुर्य पुरेपूर भूमिकेतून मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे. मुळात जगासमोर असलेली गोपिकाबाईंची भूमिका नकारात्मक नसून ती स्वत:च्या सुखासाठी किंवा हेतूसाठी झगडणारी स्त्री आहे. आणि ते सुख तिच्या मुलांमध्ये शोधणारी ती गोपिका आहे. हातात असलेली सत्ता, पेशवाईचा मान कुठे तरी निसटून जाईल या भीतीने ती काहीशी आक्रमक होत जाते आणि पुढे पेशवाईतील राजकारणाचा भाग होऊन बसते. त्यामुळे ही भूमिका साकारताना मान-मरातब, मुलांप्रति असलेली माया, पेशवाईची टिकवण्याची जिद्द आणि त्यांच्यातील नकारात्मक बाजू अशा सर्व छटांचा विचार भूमिका साकारताना करावा लागतो. भूमिका एकांगी होऊ  नये हेदेखील या पात्रापुढेचे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी साकारलेली ही पहिली ऐतिहासिक भूमिका आहे. ज्यामध्ये पेशवाईतील वेशभूषा, पात्राचे पैलू हे इतर भूमिकांपेक्षा वेगळे आहेत. माझ्यासाठी हे नवीन असल्याने वेगळे काही तरी करायला मिळाल्याचा आनंद आहे, असं त्या म्हणतात. आपल्या दिसण्यातून आणि वागण्यातूनही तितक्याच मृदू असणाऱ्या ऐश्वर्या नकारात्मक भूमिकेविषयी सांगतात, नकारात्मक भूमिका साकारणे कठीण नाही, पण ती का नकारात्मक आहे हे कलाकाराने आत्मसात करायला हवे. पात्राच्या नकारात्मक भूमिकेमागची पार्श्वभूमी लक्षात घेतली की, ते पात्र कलाकाराला अधिक जिवंत वाटू लागते त्यामुळे ते पात्र साकारणे अधिक सहज होते. आजवर सोज्वळ, संवेदनशील आणि प्रेमळ अशा अनेक भूमिका केल्या. त्यात जितकी सहजता प्रेक्षकांना दिसली तितकी याही भूमिकेत दिसेल, असं त्यांनी सांगितलं. नकारात्मकता मांडण्यासाठी काही विशेष अट्टहास करावा लागतो असे नाही. किंबहुना ते जितक्या उत्स्फुर्ततेने बाहेर येईल तितकी भूमिका जिवंत होत जाते. मालिका, चित्रपट किंवा नाटक या तिन्ही माध्यमांत कलाकारांनी विशिष्ट भूमिका साकारणे ही एक प्रक्रिया असते ज्यामध्ये दिग्दर्शक महत्त्वाचा असतो. कारण या प्रक्रियेनंतर लोकांना काय दिसणार आहे हे दिग्दर्शक जाणत असल्याने दिग्दर्शकाच्या सूचना लक्षात घेऊ न काम करत राहायचे, हा आपला प्रयत्न असतो असंही त्यांनी सांगितलं. मराठी मालिकांसोबतच हिंदीमध्येही ऐश्वर्या यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन मालिकाविश्वात काम करताना जाणवलेला फरकाविषयी त्या सांगतात, मराठीतला आपलेपणा तिथे नाही. किंवा आपल्याकडे ज्या पद्धतीने प्रत्येकाशी वैयक्तिक ऋणानुबंध जोडले जातात तसे तिथे होत नाही. हिंदीमध्ये काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ अधिक व्यावसायिक विचारांचे आहेत. तिथल्या वातावरणातील औपचारिकता आणि आपल्याकडची कुटुंबसंस्कृती यात प्रकर्षांने फरक जाणवतो. मुळात तिथे आशयाकडे बरेचसे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे मालिकेतून काय मांडायचे आहे हे बाजूला पडून मालिका वेगळ्याच दिशेने धाव घेते. परंतु हिंदी काम केल्यावर तुम्हाला देशपातळीवरही वेगळी ओळख निर्माण करता येते. राज्याच्या सीमा ओलांडून आपण सर्वपरिचित झाल्याने प्रसिद्धीचा नवा मार्ग खुला होतो. विशेष म्हणजे आता हिंदीप्रमाणे मराठी मालिकांचाही आर्थिक दर्जा वधारला आहे. परंतु दोन माध्यमांत कधीही तुलना करता येणार नाही, कारण दोन्हींकडून मिळणारे समाधान आणि आनंद वेगवेगळा आहे, असं त्या सांगतात.

सध्या ‘सोयरेसकळ’ या नाटकातही ऐश्वर्या प्रमुख भूमिका साकारत असून बऱ्याच वर्षांनी त्या रंगमंचावर काम करत आहेत. विशेष म्हणजे या नाटकात त्यांना दुहेरी भूमिका साकारावी लागली आहे. दोन काळांतील घटनांचा वेध घेऊ  पाहणाऱ्या या नाटकात एकीकडे सत्तर वर्षांच्या ताईआत्या आणि दुसरीकडे समवयस्क असेलली माई या दोन भूमिका ऐश्वर्या साकारत आहे. या दोन्ही भूमिकांमध्ये तिळमात्र साधम्र्य नसून भाषा आणि वेशभूषाही वेगळी आहे.  विशेष म्हणजे एकाच वेळी दोन्ही भूमिकांचा आलटूनपालटून सुरू असलेला रंगमंचीय आविष्कार प्रेक्षकांना जितका आनंद देतो तितकाच तो प्रेक्षकांपुढे मांडणे आव्हानात्मक आहे. या नाटकातून मला मिळालेला अनुभव हा प्रसिद्धी आणि समाधानाच्या पलीकडे खूप काही देऊन जाणारा आहे. मुळात आपण वेगळे काही तरी करू शकतो आणि ते लोकांपर्यंत लीलया पोहोचवू शकतो याचा आत्मविश्वास या नाटकातून मिळाल्याचे ऐश्वर्या यांनी सांगितले.

नाटक, सिनेमा आणि मालिकांच्या अभिनयातील वेगळेपण सांगताना त्या अभिनयातले बारकावे दर्शवतात. त्यांच्या मते नाटकातील अभिनय हा उठावदार आणि काहीसा भडक स्वरूपात असतो. अभिनय, हावभाव आणि आवाजात तो उठाव असला तरच शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. मग त्या नाटकाच्या तालमी असो किंवा कलाकारांकडून शिकणे असो, एकंदरच तो अनुभव मजेशीर आहे. याउलट मालिकेतील किंवा कॅमेऱ्यासमोरील अभिनय हा शांतपणे करावा लागतो. तिथे एक पापणी जरी वर-खाली झाली तरी ती खटकते. मालिकेतला अभिनय हा टीआरपीवर अवलंबून असल्याने भूमिकेत आणि अभिनयात काळानुसार बदल होत जातो. त्यामुळे समोर आलेले दृश्य चोख पार पाडायचे हे तत्त्व कायम सोबत असावे लागते.

चित्रपटात मात्र कथा आपल्या डोळ्यांसमोर असल्याने आणि काय करायचे आहे याचा अंदाज असतो तसेच भूमिका कुठे सुरू होणार आणि कुठे संपणार याची माहिती असते, असं सांगतानाच नाटक, मालिका आणि चित्रपटांपेक्षा ‘जाहिरात’ हे क्षेत्र आपल्याला अधिक कौशल्यपूर्ण वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले. कारण काही सेकंदांत तुम्हाला अभिनय, हावभाव, आशय-विषय सर्व काही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे असते. यातून जाहिरातदार आणि ग्राहक या दोन्ही गटांपर्यंत ती लीलया पोहोचवणे हे खरे कौशल्य असल्याचे नमूद करत जाहिरात माध्यमातील वेगळेपण त्या समजावून देतात.

अविनाश आणि ऐश्वर्या यांच्या जोडीविषयी आणि कामाविषयी त्या म्हणतात, संसारासोबतच गेली अनेक र्वष आम्ही एकत्र काम करत आहोत. त्यामुळे त्याला काय मांडायचं आहे किंवा मला काय सांगायचं आहे हे आम्हाला केवळ नजरेतून समजतं. किंबहुना आम्हालाच आता एकत्र काम करण्याचा कंटाळा आल्याने कामातील वेगळेपणा जपण्यासाठी किमान एक-दोन र्वष तरी मालिकांमधून एकत्र काम न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं. समाजमाध्यमांविषयी त्या म्हणतात, मी जरी समाजमाध्यमांवर फारशी सक्रिय नसले तरी त्या संदर्भात घडणाऱ्या घटना आपल्या कानावर येत असतात. स्वत:ला जगासमोर सादर करण्याचे ते उत्तम माध्यम आहे, पण त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो यावर त्याचे परिणाम दिसून येतात. बऱ्याचदा काही लोक आपल्या मतांचा भडिमार या माध्यमातून करतात त्यामुळे काही काळाने लोक ते गांभीर्याने पाहात नाहीत आणि जेव्हा आपण काही तरी महत्त्वाचे मत समाजमाध्यमांवर मांडतो तेव्हा ते दुर्लक्षित केले जाते. म्हणून काय, कसे आणि किती आपण त्याच्या आहारी जातो आहोत याचाही विचार व्हायला हवा. आणि हल्ली मोबाइल वापरण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, लोकांचे फोन नाटकातही खणखणतात. जेव्हा नाटक सुरू असताना नटाकडून आवाज पोहोचत नाही तेव्हा प्रेक्षक जर नाटक थांबवू शकतात तर प्रेक्षकांकडून होणाऱ्या अवाजाला रोखण्यासाठी नाटक थांबवणे हे तितकेच योग्य आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.  घर आणि अभिनय क्षेत्र या दोन्ही गोष्टी सांभाळण्यातही त्या तितक्याच पटाईत आहेत. गृहकर्तव्यांविषयी त्या सांगतात, आपल्या कामाचे तास, कामाची पद्धत काहीशी वेगळी असली तरी घराकडे आजवर कधीच दुर्लक्ष झाले नाही. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या मी आणि अविनाश आम्ही दोघे मिळून पार पडतो. मुळात घरातल्या जबाबदाऱ्या असा काही वेगळा प्रकार नाही. आपल्या मनात असेल तर वेळेचे नियोजन करून सर्व काही सांभाळता येते. शिवाय सेटवर असतानाही एक कुटुंब तयार होत असते. अनेकदा सेटवर मी स्वत: सगळ्यांसाठी जेवण बनवते. तुम्हाला कामाची आवड असली की कोणतीच गोष्ट कठीण वाटत नाही, असं त्या आनंदाने सांगतात.

सध्या ‘स्वामिनी’ मालिके तून साकारलेली भूमिका लोकांपर्यंत पोहोचावी, ती आवडावी अशी अशा त्यांनी व्यक्त केली. शिवाय माध्यमांमध्ये नवनवीन प्रयोग किंवा वेगळ्या आशयाचे प्रकल्प करत राहण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.