क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास १९ दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आर्यनच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोर्टाकडून वारंवार जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता आर्यनला फक्त देवाकडून आशा उरल्या आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून आर्यन हा जेलमध्ये होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होत असल्याची माहिती समोर येत आहे.

जेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलमध्ये सुरुवातीला आर्यन काहीही न खाता पिता शांत एका कोपऱ्यात बसलेला असायचा. मात्र आता त्याच्या दिनक्रमात थोडासा बदल झाला आहे. जामीन मिळेल या आशेवर असलेला आर्यन जेलमध्ये होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होत आहे. तसेच आरती संपेपर्यंत तो त्या ठिकाणी असतो, अशीही माहिती समोर येत आहे.

गेल्या ८ ऑक्टोबरपासून आर्यन हा आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी वकिलांकडून पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत सलग सहा ते सात वेळा आर्यनच्या जामीनावर सुनावणी झाली असली तरी त्याला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे साधारण १९ दिवसांपासून आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. ज्या दिवशी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले, त्या दिवसापासून आतापर्यंत त्याने अन्नाचा एकही घास खाल्लेला नाही. त्याला जेल मधील खाणे-पिणे आवडत नाही. त्यामुळे तो ते खात नसल्याचे बोललं जात आहे. तसेच तो बरॅकच्या बाहेरही येत नव्हता.

आर्यनकडून दररोज देवाची प्रार्थना

मात्र काही दिवसांपासून आर्यन हा जेलमध्ये होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होत असल्याचे बोललं जातं आहे. लवकरात लवकर जामीन मिळावा, यासाठी आर्यन दररोज देवाची प्रार्थना करत आहे. आर्यन ज्या बॅरेकमध्ये राहतो, त्या ठिकाणी एक छोटेसे मंदिर आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजता त्या मंदिरात आरती होते. आर्यन या आरतीला उपस्थित असतो. आरती संपेपर्यंत तो तिथून हलत नाही, असे वृत्त समोर येत आहे.

दरम्यान, आर्यन खानला अटक झाल्यानंतर आज म्हणजेच २१ ऑक्टोबरला शाहरुखखानने पहिल्यांदाच आर्थर रोड जेलमध्ये जाऊन मुलाची भेट घेतली आहे. ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. शाहरुख येणार असल्याची यावेळी कुणालाही कल्पना नव्हती.

साधी कार, अचानक भेट आणि १० मिनिटांची चर्चा; शाहरुख-आर्यन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

आर्यन खानच्या व्हाटस्अप चॅटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचे कबूल केले होते. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.