Ashish Chanchlani On Indias Got Latent Controversy : लोकप्रिय यूट्यूब आणि स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमुळे काही महिन्यांपूर्वीच मोठा वाद निर्माण झाला होता. शोमध्ये पालकांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर बराच गदारोळ झाला. या शोमध्ये समय रैनासह रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मुखिजा आणि आशीष चंचलानी हेदेखील होते. टीकेनंतर या सर्वांनी जाहीर माफीही मागितली आणि आता सगळेच जण त्यांच्या त्यांच्या कामात व्यग्र झाले आहेत.
अशातच याप्रकरणी आशीष चंचलानीने पहिल्यांदाच त्याची प्रतिक्रिया दिली आहे. फरीदून शहरयारशी बोलताना त्याने सांगितले की, या वादानंतर सगळ्यात आधी पोलिस त्याच्या मुंबईतील घरी चौकशीसाठी आले होते. याबद्दल आशीष म्हणतो, “तेव्हा दोन महिने खूपच गदारोळ झाला होता. त्यावेळी समय व्हँकुव्हरला होता, अपूर्वा सापडत नव्हती. ती खूप घाबरली होती. मला अजूनही वाटतं की, तेव्हा तिची काहीच चूक नव्हती. रणवीर तर गायबच झाला होता, त्यामुळे मुंबईत फक्त मीच होतो आणि पोलिसांना माझा पत्ता माहिती होता, म्हणून ते थेट माझ्याकडे आले.”
या वादात मी नकळत अडकलो : आशीष चंचलानी
पुढे आशीष सांगतो की, या प्रकरणात सगळ्यात जास्त त्रास त्याच्या कुटुंबाला झाला. तो म्हणाला, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं काही घडलं. मी धर्म, राजकारण अशा विषयांपासून कायमच दूर राहिलो. कधी त्यावर विनोद केले नाहीत, पण या वादात मी नकळत अडकलो. मला आठवतंय, मी तेव्हा शूटिंग करत होतो. माझा भाऊ धावत आला आणि म्हणाला, ‘बंद कर ते. घरी जा. प्रकरण तापलंय. मी घरी पोहोचताना सगळे लोक माझ्याकडेच बघत होते. ते चित्र खूप भीतीदायक होतं.”
शेवटी तो म्हणाला, “माझ्यासाठीही हे कठीण होतं, पण समय, अपूर्वा आणि इतरांसाठी तर अजूनच.” दरम्यान, आशीष चंचलानी हा यूट्यूबवरील एक लोकप्रिय यूट्यूबर आहे. ‘Ashish Chanchlani Vines’ असं त्याच्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे. यावर तो त्याचे अनेक विनोदी व्हिडीओ शेअर करत असतो. यूट्यूबवर त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. यूट्यूबवर त्याचे तीस लाखांहून अधिक सबसक्रायबर्स आहेत. यासह सोशल मीडियावर त्याचे बरेच चाहते आहेत.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ हे नेमकं प्रकरण काय होतं?
समय रैना होस्ट असलेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला पालकांबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाला. अगदी राजकीय वर्तुळातूनही यावर टीका-टिप्पणी झाली होती. यानंतर रणवीर अलाहाबादियासह कार्यक्रमाचा होस्ट समय रैना, आशीष चंचलानी आणि अपूर्वा मुखिजा यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.