ज्येष्ठ विनोदी अभिनेते आसरानी आता मराठीत

मराठीत काम करताना मनात एक आपुलकीची भावना निर्माण होते.

asrani

सध्या बॉलिवूडमधील सर्वांनाच मराठीचे वेध लागले आहेत. कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत सर्वच जण मराठीची वाट धरू लागले आहेत. बॉलिवूडमध्ये आपल्या अदाकारीसोबतच संवादफेकीच्या अनोख्या शैलीमुळे जनमानसाच्या मनावर राज्य करणारे असरानी आता ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत

‘फॅमिली ४२०’ हे चित्रपटाचं शीर्षक आणि असरानींसारखा हिंदी चित्रपटसृष्टीतील कॉमेडीचा बादशहा चित्रपटात असल्याने हा चित्रपट विनोदी असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. निखळ विनोदाच्या जोडीला दर्जेदार निर्मितीमूल्यांचा समावेश असल्यान या चित्रपटात एक मेसेजही दडलेला आहे. हसत खेळत, प्रेक्षकांचं मनोरंजन करत महत्त्वाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात येणार आहे.
‘फॅमिली ४२०’ निमित्ताने पुन्हा एकदा मराठीत काम करण्याच्या अनुभवाबाबत असरानी म्हणाले, विनोद हे निरोगी जीवन जगण्याचं टॉनिक आहे. कायम हसा आणि निरोगी रहा हा मंत्र मी कारकीर्दीच्या सुरूवातीपासून जपला आहे. ‘फॅमिली ४२०’ या चित्रपटातही मला तेच काम करायचं असल्याने मी लगेच होकार दिला. एखाद्याच्या डोळ्यांत अश्रू आणणं, एखाद्याला दुखावणं खूप सोपं आहे, पण एखाद्याच्या चेहऱयावर हास्याची लकेर उठवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. हे पुण्यांचं काम करतच मी बॉलिवूडमध्ये दाखल झालो असून पुढेही करत राहणार आहे. ‘फॅमिली ४२०’ या चित्रपटातील भूमिका जरी विनोदी असली तरी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक संतोष गायकवाडही चित्रपटावर खूप मेहनत घेत असून सर्व कलाकारांनी त्यांना योग्य साथ लाभत आहे. मी जरी हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं असलं तरी मराठीत काम करताना मनात एक आपुलकीची भावना निर्माण होते. इथे काम करताना जणू काही आपल्या कुटुंबासोबतच काम करतोय असं वाटतं.

असरानींसारखा हिंदीतील एका प्रख्यात विनोदवीराने या चित्रपटात काम करायला होकार दिल्याने मनासारखं काम करायला वाव मिळाल्याचं सांगत दिग्दर्शक संतोष गायकवाड म्हणाले, कोणत्याही कथेला आवश्यक असलेले कलाकार मिळाले की तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ठसतो. ‘फॅमिली ४२०’ बाबतीत नेमकं असंच घडलं आहे. या चित्रपटातील एका भूमिकेसाठी असरानींसारख्या तगड्या विनोदवीराची गरज होती. पटकथा ऐकताच भूमिका साकारायला त्यांनी होकार दिल्याने पुढचं काम खूप सोपं झालं. असरानींसारख्या अनुभवी कलाकाराला फारसं काही सांगण्याची गरज नाही. आपल्याला जे हवं ते त्यांच्याकडून आपोआप मिळत जातं. इतर सर्वच कलाकार अपेक्षेप्रमाणे काम करीत आहेत.

असरानींच्या जोडीला या चित्रपटात सुनील पाल, उपासना सिंग, विजय पाटकर, विजय कदम, स्वप्निल राजशेखर, आशिष नेवालकर, हर्षदा पाटील, सुकन्या कुलकर्णी, गीता निखारगे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. सुबोध नागदेवे यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून बीना सातोस्कर आणि सुबोध नागदेवे यांनी गीतलेखन केलं आहे. संगीतकार सुशील पेंढारी यांनी या गीतांना स्वरसाज चढवला आहे. अवधूत गुप्ते, वैशाली माडे, बेला शेंडे, सुदेश भोसले, नेहा राजपाल या मराठीतील आघाडीच्या गायकांनी या चित्रपटातील गीतांना स्वर दिला आहे. संतोष गायकवाड यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ‘लावण्य प्रॉडक्शन अँड क्रिएशन’च्या बॅनरअंतर्गत निर्माते देव राज करत असून, संकल्पनादेखील त्यांचीच आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Asrani in marathi movie family

ताज्या बातम्या