गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये चरित्रपट निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. ‘बालगंधर्व’, ‘एक अलबेला’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘लोकमान्य’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘हरिश्चंदाची फॅक्टरी’ असे अनेक दर्जेदार चरित्रपट मराठी चित्रपटसृष्टीमध्येही तयार झाले आहेत. सध्या हिंदीप्रमाणे मराठीमध्येही चरित्रपटांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. २०२२ मधला सर्वात गाजलेला चरित्रपट म्हणजे “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे”. शिवसेनेचे ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारलेल्या या चित्रपटामध्ये त्याची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे.

धर्मवीर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. आनंद दिघे यांची भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य पेलावत सर्वांना लक्षात राहिलं अशा ताकदीचा अभिनय प्रसाद ओकने केला. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांच्या कामाचेही लोकांनी खूप कौतुक केले. आनंद दिघे यांच्यासारखी चालण्याची, उभे राहण्याची लकब प्रसाद शिकला. या व्यक्तिरेखेसाठी त्याने बरीच मेहनत केली. या भूमिकेमुळे त्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रसादला सर्वात्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे.

नुकताच प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२ हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये प्रसादला सर्वात्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासोबतचा फोटो पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये “धर्मवीरसाठी अजून एक पुरस्कार…!!! सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रवाह पिक्चर पुरस्कार…!!! पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार – टीम धर्मवीर, zee स्टुडिओज, मंगेश कुलकर्णी सर, मंगेश देसाई, आणि प्रवीण तरडे आणि अर्थातच रसिक प्रेक्षकहो…!!! मा. गुरुवर्य दिघे साहेबांना वंदन” असे म्हटले आहे. त्याला या भूमिकेसाठी दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

आणखी वाचा – “प्रभू श्रीराम आणि कृष्ण यांच्याप्रमाणे तुम्ही…” कंगनाने दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

धर्मवीर प्रदर्शित होण्याआधी एप्रिल महिन्यामध्ये प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याने काही दिवसांपूर्वी ‘सुटका’ या त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.