‘शोले’ची बसंती किंवा चाहत्यांची ड्रीमगर्ल… अभिनेत्री हेमा मालिनीने नेहमीच विविध चित्रपटांतून भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. बरीच दशकं हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हेमा मालिनी यांनी राजकीय नेत्यांनाही वेड लावले होते. या नेत्यांमधील एक नाव म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी.

अभिनयासोबतच राजकारणामध्येही सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये एक किस्सा सांगितला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हेमामालिनी यांचा ‘सीता और गीता’ हा चित्रपट २५ वेळा पाहिल्याचे सांगितले. भाजपच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हेमा मालिनी यांनी विनोद खन्ना यांच्याविषयीचीसुद्धा एक आठवण सांगितली. ‘मला राजकारणामध्ये आणण्याचे श्रेय विनोद खन्ना यांना जाते’, असे हेमा मालिनी म्हणाल्या.

यावेळी आपल्या राजकीय कारकिर्दीतील बऱ्याच आठवणी जाग्या करत हेमा मालिनी यांनी काही किस्से उपस्थितांना सांगितले. त्या म्हणाल्या, ‘भाषणामध्ये मी नेहमीच अटलजींचा उल्लेख करते. पण, मी त्यांना कधी भेटले नव्हते. एकदा लालकृष्ण अडवाणी मला अटलजींना भेटायला घेऊन गेले. मी ज्यावेळी अटलजींना पहिल्यांदा भेटले तेव्हा ते फारसे खुलून बोलत नव्हते. त्यावेळी तिथे असलेल्या एका महिलेला मी सर्व ठिक आहे ना..? असा प्रश्न केला. तेव्हा ती महिला म्हणाली, अटलजी तुमचे फार मोठे चाहते आहेत. त्यांनी १९७२ मध्ये आलेला ‘सीता और गीता’ हा चित्रपट २५ वेळा पाहिला आहे. त्यामुळे अचानक तुम्ही समोर आल्यामुळेच ते थोडे संकोचले असावेत.’

हेमा मालिनी यांचा हा किस्सा अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेला. राजकीय वर्तुळामध्ये मानाचं स्थान असणारी इतकी मोठी व्यक्ती आपल्या चाहत्यांपैकी एक आहे, हे जेव्हा हेमामालिनी यांना कळलं तेव्हा त्यासुद्धा भारावून गेल्या होत्या. त्यामुळे या ड्रीमगर्लची जादू राजकीय क्षेत्रातही पाहायला मिळाली, असेच म्हणावे लागेल.