भारताच्या इतिहासाची चर्चा होते तेव्हा ‘रामायण’ आणि ‘महाभारत’चा उल्लेख होणं साहजिक आहे. त्याशिवाय आपला इतिहास पूर्ण होत नाही. पौराणिक कथांमध्ये ‘महाभारत’ आणि ‘रामायण’चं अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळेच ८०-९० च्या काळात बी. आर. चोप्रा आणि रामानंद सागर यांनी मालिकांच्या माध्यमातून हा इतिहास प्रेक्षकांसमोर सादर केला. त्याकाळी या मालिका तुफान गाजल्या. इतकंच नाही तर आजही या मालिकांची क्रेझ पाहायला मिळते. सध्या लॉकडाउन सुरु असल्यामुळे या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. टीआरपीच्या शर्यतीत ‘रामायण’ बाजी मारत आहे. तर ‘महाभारत’चीही लोकप्रियता वाढताना दिसत आहे. त्यामुळेच आता महाभारत ही मालिका कलर्स या वाहिनीवर दाखविण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. सध्या या मालिका दूरदर्शनवर प्रसारित केल्या जात आहेत. मात्र या मालिकांची वाढती मागणी पाहता आता महाभारत, कलर्स टीव्ही या वाहिनीवर दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ४ मे पासून ही मालिका संध्याकाळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘महाभारत’ ही मालिका ४ मे पासून संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं ट्विट कलर्स या वाहिनीकडून करण्यात आलं आहे. सोबतच त्यांनी महाभारत मालिकेतील एका सीनचा व्हिडीओही शेअर केला आहे.

दरम्यान, बी.आर. चोप्रा. यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत अभिनेता नितीश भारतद्वाज, मुकेश खन्ना, रुपा गांगुली, गजेंद्र चौहान आणि पुनीत इस्सार हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. ही मालिका १९८८ साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.