एस. एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनात साकारलेला ‘बाहुबली २’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास आता अवघे काही महिनेच बाकी राहिले आहेत. त्या दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘बाहुबली २’ चा आणखी एक पोस्टर नुकताच प्रदर्शित केला आहे. राजमौलीचा हा आगामी चित्रपट किती भव्य असणार आहे, याची प्रचिती यातून येते. ‘बाहुबली द कन्क्ल्यूजन’ हा ‘बाहुबली’ या चित्रपटापेक्षा अधिक मोठा आणि भव्य असणार असल्याचे चित्रपटाच्या पोस्टरमधून दिसून येते. महाशिवरात्रीच्या औचित्यावर चाहत्यांसाठी हे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेता प्रभास या पोस्टरमध्ये दिसून येत असून हे पोस्टर प्रदर्शित करत निर्मात्यांनी ‘टीम बाहुबलीकडून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा’, असे कॅप्शन दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बाहुबली २’ चे हे नवे पोस्टर निर्माता करण जोहर याने ट्विट केले आहे. सदर पोस्टरला त्याने कॅप्शन दिलेय की, लवकरच बाहुबली २ चा मोशन पोस्टर येतोय. या पोस्टरमध्ये एका विशालकाय हत्तीच्या डोक्यावर प्रभास नीडरपणे उभा असलेला दिसतो.

‘बाहुबली २’ हा चित्रपट तेलगु, तमिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी भागाची सर्व जबाबदारी करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे घेण्यात आलेली आहे. यासाठीच ‘बाहुबली २’च्या चित्रपटगृह अधिकारांसाठी घसघशीत रक्कम मोजण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बाहुबली- द बिगिनींग’ या चित्रपटाच्या हिंदी भागासाठी १२० कोटी रुपयांना चित्रपटाचे काही हक्क विकण्यात आले होते. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली’ हा हिंदी भाषेत ध्वनिमुद्रित झालेला आणि बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला मिळवणारा पहिलाच चित्रपट ठरला होता.

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. देशोदेशीच्या प्रेक्षकांवर भुरळ पाडण्यात यशस्वी झालेल्या या चित्रपटासाठी भव्य सेट, दाक्षिणात्य चित्रपटांमधील तगडी स्टारकास्ट पाहता विविधभाषी प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगलीच पसंती दिली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baahubali 2 new poster prabhas stands on the head of a beast
First published on: 24-02-2017 at 13:14 IST