चित्रपटांची विक्रमी कमाई आणि ‘बाहुबली २’ हे समीकरण आता चांगलच जमून आलं आहे. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. जगभरातील प्रेक्षकांवर ‘माहिष्मती साम्राज्य’ आणि ‘बाहुबली’चीच जादू पाहायला मिळते आहे. मुख्य म्हणजे विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने भारतात आतापर्यंत ३८७ कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. किंबहुना हा आकडा क्षणाक्षणाला बदलत आहे. आतापर्यंत आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटानेच इतकी घसघशीत कमाई केली होती. पण, आता मात्र मिस्टर परफेक्शनिस्टच्या या चित्रपटाला धोबीपछाड करण्यासाठी प्रभासचा ‘बाहुबली २’ सज्ज झाला आहे.

एस.एस. राजामौली दिग्दर्शित हा चित्रपट ज्या वेगाने विविध विक्रमांना गवसणी घालतो आहे ते पाहता आता त्याला रोखणं निव्वळ अशक्यच आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देणारं एक ट्विट केलं आहे.

‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’ या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये ‘बाहुबली २’ पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. तिच उत्सुकता आणि चित्रपटासाठी असणारं प्रेक्षकांचं वेड पाहता राजामौली आणि त्यांच्या टीमने बरीच मेहनत घेत ‘बाहुबली २’ हा चित्रपट साकारला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये टाळ्यांचा कडकडाट, प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि त्यांनी दिलेली दाद हे सर्व काही फार महत्त्वाचं असल्याचं म्हणत चित्रपटातील कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘बाहुबली २’ मधील काही दृश्ये आणि त्यांचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत.

‘बाहुबली २’ची आतापर्यंतची कमाई पाहता इतर चित्रपटांच्या प्रदर्शनावरही त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या आठवड्यात कोणताच मोठा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नव्हता. पण, १२ मे रोजी अमिताभ बच्चन यांचा ‘सरकार ३’ आणि परिणीती चोप्रा, आयुषमान खुरानाचा ‘मेरी प्यारी बिंदू’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तेव्हा ‘बाहुबली २’ला दूर सारून प्रेक्षक हे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे वळतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.