‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने प्रभासने देशभरातल्या सिनेरसिकांची मनं जिंकली आहेत. सध्या तो मुलींच्या गळ्यातला ताईतच बनला आहे. अनेकांच्या वॉलपेपर, व्हॉट्सअॅप डीपींवरही प्रभासचाच फोटो दिसतो. त्याची लोकप्रियता पाहून अनेक नावाजलेले ब्रॅण्ड त्याला आपल्या प्रोडक्टसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून घेण्यास उत्सुक आहेत.

आता हे तर सर्वांनाच माहित आहे की ३७ वर्षीय प्रभासने ‘बाहुबली’ सिनेमासाठी ५ वर्षांमध्ये दुसरा कोणताही सिनेमा स्वीकारला नव्हता. त्याच्या या समर्पणाचे दाखले सध्या सिनेसृष्टीत दिले जात आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का की ‘बाहुबली’ सिनेमाचे जेव्हा चित्रीकरण सुरू होते तेव्हा त्याला एका ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी विचारण्यात आले होते. हा ब्रॅण्ड कपड्यांपासून चपलांपर्यंत आणि फिटनेसपासून ते रोजच्या व्यवहारातल्या साहित्यांपर्यंतच्या प्रोडक्टच्या जाहिरातींसाठी प्रभासला करारबद्ध करू इच्छित होता. यासाठी प्रभासला १८ कोटी रुपये देण्यासही ते तयार होते. पण बाहुबली सिनेमाला दिलेल्या शब्दामुळे प्रभासने या करारलाही स्पष्ट नकार दिला.

दिग्दर्शक राजामौली यांनी म्हटलं की, प्रभासने दाखवलेल्या या समर्पणाशिवाय ‘बाहुबली’ टीमला एकत्र ठेवणं खूप कठीण गेलं असतं. या पाच वर्षांमध्ये अशीही एक वेळ होती जेव्हा प्रभासला आर्थिक तंगीचा सामनाही करावा लागला होता. पण तरीही त्याने दिलेला शब्द पाळला आणि त्या जाहिरातीचा स्वीकार केला नाही. जिकडे एका ठिकाणी ‘बाहुबली’ सिनेमातले इतर कलाकार वेगवेळी कामं करत होते तर दुसरीकडे प्रभास हा एकमेव अभिनेता होता ज्याने या पाच वर्षांत दुसरा कोणताच प्रोजेक्ट स्वीकारला नाही किंवा कोणती जाहिरातही केली नाही.

‘बाहुबली’ सिनेमामुळे जगभरात प्रसिद्ध झालेल्या प्रभासने २०१४ मध्ये ‘अॅक्शन जॅक्सन’ या बॉलिवूड सिनेमातही काम केले होते. हा सिनेमा फारसा चालला नसला तरी यात प्रभासची ओझरती झलक दिसते. सोनाक्षी सिन्हासोबत एका पंजाबी गाण्यावर प्रभासने २.३० मिनिटं डान्स केला होता.