‘बाहुबली २’ या सिनेमातील अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिची चर्चा सध्या सगळीकडेच रंगली आहे. अनुष्काने अनेक सिनेमांमध्ये काम केले असले तरी जगभरात तिला ‘बाहुबली २’ मुळे लोकप्रियता मिळाली. या सिनेमात ती कमालीची सुंदर दिसली असून तिने तिची भूमिकाही दमदार साकारली आहे. दाक्षिणात्य सिनेमांसाठी अनुष्का हे नाव काही नवीन नाही. आघाडीच्या नायिकांमध्ये तिचं नाव नेहमीच अग्रणी असतं. आता तर बाहुबली सिनेमाच्या यशामुळे ती घराघरांत पोहोचली आहे. म्हणून तुमच्यासाठी खास घेऊन आलोय अनुष्का शेट्टीशी निगडीत काही खास गोष्टी…
तुम्हाला माहितीये का? अनुष्का शेट्टीचं खरं नाव अनुष्का नाहीये. अनुष्का हे तिने सिनेमासाठी ठेवलेलं नाव आहे. तिचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे. सिनेमात आल्यावर तिने आपलं स्वीटी हे नाव बदलून अनुष्का असं केलं. आता हेच नाव तिची ओळख बनली आहे.
अनुष्का शेट्टी हे साऊथ सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव आहे. ती तिकडची टॉपची अभिनेत्री आहे. इतकेच नाही तर सिनेमासाठी मानधन घेण्याबाबतीतही ती दक्षिणेतील सर्व अभिनेत्रींपेक्षा कितीतरी पुढे आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतल्या अभिनेत्रींचे मानधन तसे कमीच असते. पण अनुष्का याला अपवाद आहे. अनुष्का एका सिनेमासाठी चार कोटी रूपये घेते. ‘बाहुबली २’ या सिनेमासाठी अनुष्काने तब्बल ५ कोटी रुपयांचे मानधन घेतले होते.
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनुष्का योग प्रशिक्षक होती. तिने भारत ठाकूरकडून योगचे शिक्षण घेतले आहे. भारत ठाकूर हा अभिनेत्री भूमिका चावलाचा नवरा आहे.
गेल्या एका दशकापासून आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अनुष्काने टॉलीवूडमध्ये २००५ मध्ये पदार्पण केलं होतं. अनुष्काने तिच्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये ३० हून अधिक तामिळ आणि तेलगु सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या नावावर ‘बाहुबली’ आणि ‘रूद्रमादेवी’ सारख्या हिट सिनेमांची नोंद आहे.
अनुष्का शेट्टी ही नेहमीच तिच्या कथित प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत राहते. पण तिने नेहमीच या गोष्टींना नाकारलं आहे. काही दिवसांपूर्वी तर अनुष्काने गुपचुप लग्न केल्याचीही अफवा आली होती. त्यानंतर तिचं नाव ‘बाहुबली’ फेम प्रभास याच्यासोबतही जोडलं गेलं होतं. दोघे लग्न करणार असेही बोलले जात होते. मात्र यावर दोघांनीही कधीही जाहीरपणे भाष्य केलं नाही.