‘बाहुबली: द बिगिनिंग’ या पहिल्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता त्याचा दुसरा भाग ‘बाहुबली : द कनक्ल्युजन’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल.
बहुचर्चित सिनेमा बाहुबलीचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. पण आता बाहुबलीने कटप्पाला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर २८ एप्रिल २०१७ ला मिळणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदर्शित करणार आहेत. २३ ऑक्टोबरला प्रभासचा वाढदिवस असतो. याच दिवशी ‘बाहुबली 2’ चा फर्स्ट लुक प्रदर्शित करणार आहेत. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांसाठी तो दिवस कोणत्याही सणापेक्षा कमी नसेलच.
एस. एस. राजमौली यांच्या ‘बाहुबली’ या सिनेमाने केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही प्रशंसा मिळवली होती. तिकीटबारीवर पहिला, समाजमाध्यमांवरील चर्चेत पहिला आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा डंका जगभर वाजविणाऱ्या ‘बाहुबली’ या सिनेमाने गेल्या वर्षी ६०० कोटी रुपयांची कमाई करीत विक्रमही नोंदविला होता. मात्र सिनेमा पाहून आल्यावर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न अजूनपर्यंत कायम आहे, तो म्हणजे ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले? या विषयी सर्वांनी आपआपले तर्कवितर्क लावले. मात्र, तरीही कोणाला याचे उत्तर मिळाले नाही. सोशल मिडियावर तर या प्रश्नाने धुमाकूळ घातला. ‘बाहुबली २’ या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र, सिनेमाचे तांत्रिक काम मोठे असल्याने हे प्रदर्शन लांबले असल्याने प्रेक्षकांना २८ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
या सिनेमाच्या दुसऱ्या भागात अभिनेता प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबती, सत्य राजा, तमन्ना भाटिया, सुदीप, राम्या कृष्णन, श्रिया सरण, रोहिणी हे कलाकार दिसतील.
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2016 रोजी प्रकाशित
प्रभासच्या वाढदिवसालाच प्रदर्शित होणार ‘बाहुबली’चे पोस्टर
बाहुबलीचा फर्स्ट लुक अभिनेता प्रभास याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदर्शित करणार
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-08-2016 at 18:17 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bahubali the conclusion first look on prabhas birthday