- सर्वोत्कृष्ट चित्रपटासह ७ पुरस्कार
- मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
पदार्पणातच सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या ‘शांताई मोशन पिक्चर्स’च्या ‘बंदिशाळा’ या चित्रपटाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या ५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावून बाजी मारली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मुक्ता बर्वे, सर्वोत्कृष्ट पाश्र्वगायिका प्रियांका बर्वे, सर्वोत्कृष्ट पाश्र्वसंगीत विजय गवंडे, सर्वोत्कृष्ट गीत संजय पाटील, सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक नरेंद्र हळदणकर अशा तब्बल सात पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अत्यंत दिमाखदार असा हा पुरस्कार सोहळा ‘सोनी मराठी’ वाहिनीवर लवकरच पाहायला मिळणार आहे.
‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ या गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक – प्रस्तुतकर्ते आणि ‘दशक्रिया’ या चित्रपटाच्या पटकथालेखनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेले संजय कृष्णाजी पाटील यांनी ‘बंदिशाळा’ची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन केले आहे. तर स्वाती संजय पाटील यांच्या शांताई मोशन पिक्चर्स या संस्थेची ही पहिली निर्मिती असून दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे. एका सत्य घटनेवर बेतलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच संजय कृष्णाजी पाटील यांनी कादंबरीबाहेरील विषयाला हात घातला आहे. ‘बंदिशाळा’ हा एक सामाजिक विषयावरील महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकाऱ्याची कथा या चित्रपटातून उलगडणार असून ही भूमिका आणि हा वेगळा विषय मुक्ता बर्वे या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने एका उंचीवर पोहोचवला आहे. तिने या चित्रपटात माधवी सावंत या महिला तुरुंग अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वेबरोबर विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे, हेमांगी कवी, सविता प्रभुणे, आशा शेलार, प्रवीण तरडे, अश्विनी गिरी, अजय पुरकर, माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, उमेश जगताप अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने हा चित्रपट ‘कान’ आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील कान मार्केटसाठी नेण्यात आला होता. जगभरातील रसिकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. ‘बंदिशाळा’मध्ये मुक्ता बर्वे यांची अत्यंत धाडसी भूमिका असून तिची ही भूमिका पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. येत्या २१ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.