नट म्हणून आपलंही कंडिशनिंग होत असतं, आपलाही ‘सेफ झोन’ असतो. पण हे तुटणं फार गरजेचं आहे, या विचारातून जन्माला आलेले  ‘बस्ती में मस्ती’ हे नाटक नुकतेच रंगभूमीवर (खुल्या मैदानात) आले आहे. गरिबीवर असलेला व्यसनांचा आणि दुष्कृत्यांचा उतारा मागे टाकून योग्य मार्गाने जीवन जगता येते या जीवनमूल्यांचा आधार घेऊ न भाष्य करणाऱ्या या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन युकी इलियास आणि अक्षय शिंपी यांनी केले आहे. शिवाय अभिनयाची धुराही त्यांनीच पेलली आहे.

‘बस्ती में मस्ती’ या नाटकात दोन भुरटे चोर ‘अमर’ आणि ‘अकबर’ आणि या दोघांच्या बहिणी अनुक्रमे ‘शैली’ आणि ‘सना’ यांची ही गोष्ट आहे. अमर आणि अकबर परस्परांच्या बहिणींवर प्रेम करत असतात आणि बहिणीही त्यांच्यावर. पण हे अर्थातच लपून-छपून. या दोघांना लग्न करून स्थिरस्थावर होण्यासाठी मोठा हात मारायचा आहे. अर्थात चोरी करायची असते. पण याच विचाराने पुढे जो गोंधळ होतो, ते पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना बस्तीतच जावे लागेल. विशेष म्हणजे हे नाटक कु ठल्याही बंदिस्त नाटय़गृहासाठी नसून खुल्या मैदानात, चाळीत, चौकात याचे सादरीकरण होते. या नाटकाचा पहिला प्रयोग धारावीच्या अरुंद गल्लीत झाला होता तर दुसरा प्रयोग वेसावे येथील झोपडपट्टीत आणि त्यानंतर माटुंगा स्टेशनलगत असलेल्या बालसुधारगृहात करण्यात आला. यात घोषणाबाजी नाही, उपदेश नाही. हे स्वतंत्र नाटक आहे. जे ‘कथानक’ आणि ‘नट’ या दोन आयुधांवर खेळलं जातं. नाटकाचा प्रेक्षकवर्ग घटत चालल्याची ओरड वरचेवर कानांवर येते. नाटकाला प्रेक्षक येत नसेल तर आपण नाटक प्रेक्षकांच्या दारात घेऊ न जाऊ , नवा प्रेक्षक शोधू, असा यामागचा उद्देश आहे. नाटकाची भाषा ‘बम्बईया हिंदी’ असल्याने ते प्रत्येकाला आपलेसे वाटते. फक्त एका गोधडीचे नेपथ्य आणि पाण्याच्या ड्रम्स, तेलाच्या डब्याच्या पार्श्वसंगीतातून दोन चोरांची ही गोष्ट रंगत जाते. प्रत्येक प्रयोगासाठी तिकीट शुल्क शून्य रुपये ही या नाटकाची खासीयत आहे.