अनेक मालिकांची गाजलेली शीर्षक गीत गायलेल्या बेला शेंडेनं ‘स्टार प्रवाह’च्या बहुचर्चित ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेचं टायटल साँग गायलं आहे. या मालिकेच्या निमित्तानं बेलानं बऱ्याच काळानंतर टायटल साँग गायलं असून, सोशल मीडियावर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्टार प्रवाहवर १० ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’ ही नवी मालिका सुरू होत आहे. अत्यंत वेगळ्या विषयावरच्या या मालिकेविषयी बरीच उत्सुकता आहे. या मालिकेच्या टीजरला सोशल मीडियात हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, फेसबुक, ट्विटरवर मालिकेविषयी चर्चा होत आहे. या मालिकेच्या टायटल साँगच्या निमित्ताने बेला शेंडे आणि महेश काळे हे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलाकार एकत्र आले आहेत. या गाण्याद्वारे महेशने संगीतकार म्हणून नवा प्रवास सुरू केला आहे.
‘अतिशय महत्त्वाचा, संवेदनशील विषय ‘नकुशी’ या मालिकेत मांडण्यात येत आहे. एक स्त्री म्हणून मला या मालिकेचा विषय फार महत्त्वाचा वाटतो. समाज म्हणून आपण पुढारलो असं आपल्याला वाटतं. वस्तुस्थिती तशी नाही. काळ बदललाय, नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. अशावेळी अनिष्ट प्रथा-परंपरांना बाजूला करायला हवं. महेशनं संगीतबद्ध केलेलं हे गाणं मला फार आवडलं. समीर सामंतचे शब्द आणि महेशच्या संगीतातून साकारलेलं अतिशय तरल असं हे गाणं गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नक्कीच खास आहे,’ असे बेलाने सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bela shende sung nakushi tari havihavishi serial title song
First published on: 29-09-2016 at 14:01 IST