Bhargavi Chirmuley Talks about Groupism : इंडस्ट्रीमध्ये ग्रुपिझम आहे असं अनेक कलाकार वारंवार म्हणताना दिसतात. प्रत्येक दिग्दर्शकाचा, निर्मात्याचा एक वेगळा ग्रुप असतो, ज्यामध्ये ठराविक कलाकार दिसतात असं अनेकदा कलाकारांनी मुलाखतींमधून सांगितलं आहे. अशातच आता अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिनेसुद्धा यावर तिचं मत मांडलं आहे.

भार्गवी चिरमुलेने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिला इंडस्ट्रीमधील ग्रुपिझमबद्दल विचारण्यात आलेलं. यावर भार्गवी म्हणाली, “ग्रुपिझम आहे. शंभर टक्के आहे. तो ग्रुप तोडणं खूप कठीण आहे. ते त्यांच्या त्यांच्या कंफर्टझोनमध्ये काम करत आहेत. ते चूक आहे की बरोबर यात मला पडायचं नाहीये, पण आपण त्यांच्यापर्यंत पोहचणं फार कठीण झालं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यातून ग्रुपिझम आहे हे कळून येतं. ते त्यांचे त्यांचे लोक घेतात आणि त्या कंफर्टझोनमधून ते बाहेरच येत नाहीत.”

भार्गवी पुढे म्हणाली, “त्यामुळे ते वेगळ्या कलाकारांना संधीच देत नाही. आपल्याला ते भेटतात आणि म्हणतात की आपण एकत्र काम करूयात, पण तसं कधीच होत नाही. त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमियरला आपण जातो, त्यांच्या पार्टीमध्ये आपण असतो, त्यांच्या यशामध्ये आपण असतो, पण तरी त्यांच्या चित्रपटात मात्र आपण कधीच दिसत नाही आणि याचं वाईट वाटलं. एक कलाकार म्हणून वाईट वाटणारच. आम्हालाही तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तुम्ही एवढे मोठे आहात, तुमच्याकडून शिकायचं आहे, पण ते होतच नाही.”

“सगळ्यांचे आपले आपले ग्रुप आहेत. ते ग्रुप फोडणं फार कठीण आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये अनेक कलाकार आहेत, जे वेगवेगळ्या पद्धतींची कामं करू शकतात. त्यांचं त्यांचं असं मोठं विश्व आहे. आपण कितीही मेहनत केली तरी आपण त्यांच्यापर्यंत पोहचत नाही हे दुर्दैव आहे. मला असं वाटतं, ते लोक आम्हाला कलाकार समजतच नाहीत; कारण नवीन येणाऱ्या लोकांना सोशल मीडियामुळे काम मिळतं पण आम्हाला नाही मिळत किंवा त्यांना असं वाटतं की, यांच्याबरोबर काम करून आपल्याला काहीच मिळणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भार्गवी चिरमुलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात काम करत आहे. ती यापूर्वी ‘आई-मायेचं कवच’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’, ‘मोलकरीण बाई’, ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. यासह ती ‘आयडियाची कल्पना’, ‘अनवट’, ‘सासुचं स्वयंमवर’, ‘संदूक’, ‘लोकशाही’, ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटांमध्ये झळकली आहे.