या वर्षाअखेरीस भारती सिंग अडकणार लग्नबंधनात

माझे ऐकण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही

हर्ष लिंबाचिया

प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंग या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार असल्याचे तिने सांगितले. लग्नामध्ये ज्या विधी केल्या जाणार आहेत त्यासाठीही ती फार उत्साही आहे. भारतीने सांगितले की, तिला आणि हर्ष लिंबाचियाला त्यांचे लग्न मित्र- परिवारासोबत मोठ्या उत्साहात करायचे आहे. ‘मी माझ्या लग्नासाठी नक्कीच उत्साही आहे, पण त्यातूनही लग्नामध्ये मेहंदी, संगीत यांसारख्या ज्या विधी केल्या जाणार त्यासाठी मी जास्तच उत्साही आहे. मला या सगळ्या विधींचा आनंद घ्यायचा आहे. कारण इतकी वर्ष मी फक्त काम करत होते. या सर्व गोष्टीं करायला वेळच नव्हता,’ असे भारतीने पीटीआयशी बोलताना सांगितले.

‘हर्ष हा खूप साधा आहे. त्याला लग्नांमध्ये होणारा आवाज अजिबात आवडत नाही. साध्या पद्धतीने लग्न करण्यावर त्याचा विश्वास आहे. पण माझा स्वभाव मात्र पूर्ण विरुद्ध आहे. मला या सगळ्या गोष्टी फार आवडतात. शेवटी माझे ऐकण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही कारण मी त्याची होणारी बायको आहे.’

३२ वर्षीय भारती पुढे म्हणाली की, ‘लग्नाची तारीख अजून ठरली नसली तरी या वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही लग्न करणार आहोत. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा आमचा मानस आहे. अजूनपर्यंत तारीख न ठरवण्याचे कारण म्हणजे पुढच्या काही महिन्यांच्या शोच्या तारखा ठरलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा मी लग्न करेन त्याच्या महिनाभरआधी मला कोणतेही काम करायचे नाही. मला माझ्या लग्नाच्या कामात स्वतःला झोकून द्यायचे आहे. कारण इतर कामं ही सतत होत असतात पण लग्न मात्र एकदाच होतं.’

काही महिन्यांपूर्वी हर्ष आणि भारतीने साखरपुडाही केला होता. हर्ष लिंबाचिया, भारतीच्या टेलिव्हिजन शोचा लेखक आहे. दरम्यान, भारती आणि हर्षच्या रोक्याच्या समारंभाला हजेरी लावलेल्या निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘रोका पार पडल्यानंतर अंधेरीतील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व काही अगदी शेवटच्याच क्षणी ठरल्यामुळे या समारंभात काही निवडक चेहरेच पाहायला मिळाले होते. विनोदवीर कृष्णा अभिषेक, कश्मिरा शाह, निर्माता विपुल शाह आणि भारतीच्या कार्यक्रमातील काही सहकलाकारही भारतीला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सध्या भारती, कृष्णा अभिषेकीसोबत सोनी मॅक्सवर सुरु असलेल्या ‘बिट्टू बक बक’ या शोमध्ये व्यग्र आहे. ही जोडी लवकरच ‘नच बलिये’च्या नव्या पर्वात दिसू शकते असेही म्हटले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bharti singh to tie the knot by the end of