मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने शिकवण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध झाला. त्यानंतर सरकारने जीआर रद्द केला. उद्धव ठाकरे व राज ठाकरेही मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन दशकांनी एकत्र आले आणि त्यांनी मेळावा घेतला. याच दरम्यान एका अभिनेत्याने मी मराठी बोलत नाही, असं वक्तव्य केलं आहे.

भोजपुरी अभिनेता-गायक, भाजपा नेता दिनेश लाल यादव उर्फ ​​’निरहुआ’ने मराठी व हिंदी भाषेच्या या वादात उडी घेतली आहे. त्याने मराठी भाषेच्या वादावरून ठाकरे बंधूंना खुलं आव्हान दिलं आहे. मराठीऐवजी भोजपुरीमध्ये बोलल्याबद्दल आपल्याला महाराष्ट्रातून हाकलून लावण्याचा प्रयत्न करून दाखवावा, असं त्याने म्हटलं आहे.

एएनआयशी बोलताना निरहुआ म्हणाला, “मला वाटतं की हे लोक घाणेरडं राजकारण करत आहे. देशात कुठेही असं घडायला नको. आपला देश विविध भाषा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो. विविधतेतही आपली एकता टिकून आहे, हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. मला वाटतं की अशा प्रकारे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांनी ते करणं थांबवावं. हे फुटीचे राजकारण आहे. तुम्ही लोकांना एकत्र आणण्यासाठी राजकारण करा, त्यांच्यात फूट पाडू नका. जर कोणात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा. मी मराठी बोलत नाही. मी कोणत्याही नेत्याला खुलं आव्हान देतो की जर तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा, मी महाराष्ट्रातच राहतो, तुम्ही हे घाणेरडे राजकारण करू नका.”

पाहा व्हिडीओ –

निरहुआ पुढे म्हणाला, “मी देखील एक राजकारणी आहे आणि मला वाटतं की राजकारण हे लोकांच्या भल्यासाठी करायला पाहिजे, त्यांचे शोषण करण्यासाठी नाही. जर एखाद्याला पाच वेगवेगळ्या भाषा शिकायच्या असतील तर त्याने त्या शिकाव्या.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निरहुआबद्दल बोलायचं झाल्यास तो भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतला आघाडीचा अभिनेता आहे. तसेच तो राजकारणातही सक्रिय आहे. त्याने हिंदी व मराठी भाषा वादासंदर्भात केलेल्या वक्तव्याची सध्या खूप चर्चा होत आहे.