नावापासूनच उत्सुकता निर्माण केलेला ‘ती देते, तो देतो, ते देतात, सगळेच देतात शिव्या’ हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रंगारंग कार्यक्रमात या चित्रपटाच म्युझिक लाँच करण्यात आलं. भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे ही जोडी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.
चित्रपटाच्या टीमच्या उपस्थितीत नुकताच म्युझिक आणि टीजर लाँच झाला. चित्रपटात दोन गाणी आहेत. नीलेश लोटणकर यांनी लिहिलेल्या शीर्षक गीताला श्रीरंग उर्हेकर यांनी संगीतबद्ध केलं असून अनिरुद्ध जोशी यांनी हे गाणं गायलं आहे. तर जावेद अली आणि सोनाली दत्ता यांनी एक रोमॅण्टिक गाणं गायलं असून, गीतलेखन दीपक गायकवाड आणि संगीत दिग्दर्शन मनोज टिकारिया यांचं आहे.
‘शिव्या’ हा प्रत्येकाच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे. प्रत्येकाच्या बोलण्यात कधी ना कधी शिव्या येतातच. सतत शिव्या देणाऱ्या एका माणसाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो, की दुसऱ्या दिवसापासून त्याला शिव्या देता येत नाही. मग त्या माणसाचं काय होतं अशा धमाल संकल्पनेवर हा चित्रपट बेतला आहे. साकार राऊत यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. साकार राऊत आणि नीलेश झोपे यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. सारा मोशन पिक्चर्स, गोल्डन पेटल्स फिल्म्स, कर्मा फिल्म्स आणि रंगमंच एण्टरटेनमेन्ट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ध्वनी साकार राऊत, नीलेश झोपे, मिहीर करकरे आणि आशय पालेकर हे नवोदित तरुण या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह पियुष रानडे, विद्याधर जोशी, उदय सबनीस, शुभांगी लाटकर असे अनुभवी कलाकार आहेत.
चित्रपटाविषयी दिग्दर्शक साकार राऊत म्हणाले, ‘आपण बोलताना सहजपणे शिव्या देतो. त्याचा अर्थ काय, आपल्या आजूबाजूला कोण आहे याचाही विचार करत नाही. शिव्या दैनंदिन आयुष्याचाच भाग आहेत. शिव्या ही संकल्पना घेऊन एक वेगळ्या धाटणीचं कथानक मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. चित्रपटाचं संगीत फार उत्तम झालं आहे. दोन्ही गाणी श्रवणीय झाली आहेत. तरूणांना ही गाणी नक्कीच आवडतील.’