Rohit Arya called Marathi Actress Ruchita Jadhav: मुंबईतील पवई येथे असलेल्या आरए स्टुडिओच्या इमारतीत १७ मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवून त्यांना जाळण्याची धमकी देणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. ३० ऑक्टोबर रोजी शुक्रवारी हा सगळा धक्कादायक प्रसंग घडला. आता या प्रकरमात एक मोठी माहिती समोर येत आहे. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने तिच्या सोशल मीडियावर काही स्टोरी शेअर केल्या आहेत. रोहित आर्यने काही दिवसांपूर्वी आरए स्टुडिओत येण्यासाठी फोन केला होता, असा दावा रुचिता जाधवने केला आहे.

अपहरणाची स्क्रिप्टही ऐकवली

रुचिता जाधवने टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना सदर घटनाक्रम कथन केला आहे. तसेच या घटनेची माहिती सोशल मीडियावरही दिली आहे. मुलांचे अपहरण करणारी स्क्रिप्ट असून त्यात तुला शिक्षिकेचे पात्र निभवायचे आहे, असे रोहित आर्यने सांगितले असल्याचे रुचिता जाधवने म्हटले.

वृत्तवाहिनीशी बोलताना रुचिता म्हणाले, मला ४ ऑक्टोबर रोजी रोहित आर्यचा मेसेज आला होता. मी एक चित्रपट करणार असून त्याबाबत बोलायचे आहे, असे त्याने सांगितले होते. त्याच दिवशी आम्ही सायंकाळी बोललो. नऊ मिनिटे आम्ही एकमेकांशी बोललो. यावेळी रोहित आर्यने मला चित्रपटाची कथा ऐकवली.

marathi-actress-ruchita-jadhav-story
मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने शेअर केलेली स्टोरी

एका चांगल्या माणसाचा लढा… काय होती कथा?

“एक भला माणूस त्याच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काही मुलांना ओलीस ठेवतो आणि सरकारशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो दहशतवादी नसतो, त्याला फक्त त्याचे म्हणणे मांडायचे असते”, अशी कथा रोहित आर्यने ऐकवल्याचे रुचिताने सांगितले. यात माझी भूमिका काय असेल? असे विचारले असता रोहित आर्य म्हणाला की, तुझी शिक्षिकेची भूमिका असेल जी त्या मुलांबरोबर ओलीस ठेवली जाते.

पवईला जाणे का टाळले?

रोहित आर्यने २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान मुंबईच्या पवईमधील आरए स्टुडिओत ऑडिशन घेणार असल्याची माहिती रुचिता जाधवला दिली होती. यासाठी त्याने पत्ता आणि मॅपही पाठवला होता. या संभाषणचा स्क्रिनशॉट रुचिता जाधवने सोशल मीडियावर शेअर केला. मात्र कौटुंबिक कारणास्तव तिला ऑडिशनला जाता आले नाही.

ruchita jadhav status
रोहित आर्य आणि रुचिता जाधव यांच्यात झालेले चॅट

“माझ्या सासऱ्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे मला मुंबईला जाणे शक्य झाले नाही. सोमवारी रोहित आर्यचा मला मेसेज आला होता. मुंबईत येण्याबाबत त्याने विचारणा केली होती. मात्र सासऱ्यांच्या प्रकृतीचे कारण सांगून मी जाणे टाळले. यानंतर रोहित आर्यने मला १५ नोव्हेंबर नंतर भेटू, असा मेसेज पाठवला. पण त्यानंतर काल टीव्हीवर त्यांची बातमी पाहून धक्काच बसला”, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री रुचिता जाधवने दिली.

नेमका प्रकार काय?

रोहित आर्यने गुरुवारी पवई परिसरातील एका स्टुडिओत बनावट ऑडिशन आयोजित करून सुमारे १०० विद्यार्थ्यांना बोलावून घेतले होते. त्यापैकी बहुतेकांना परत पाठवल्यानंतर त्याने १७ मुले आणि दोन प्रौढांना स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले. या घटनेनंतर रोहितने समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ शेअर केला आणि आपले म्हणणे मांडले. “ना मी दहशतवादी आहे, ना माझी पैशांची मागणी आहे. आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना ओलीस ठेवले आहे. मला काही लोकांशी बोलायचे असून त्यांना प्रश्न विचारायचे आहेत,” असे त्याने व्हिडिओत म्हटले होते.

रोहित आर्यचा एन्काउंटर कसा झाला?

लहान मुलांची सुटका करण्यासाठी पोलीस स्टुडिओच्या बाथरुमच्या खिडकीतून आतमध्ये शिरले. यावेळी आरोपीकडे एक एअरगन आणि काही रासायनिक पदार्थ पोलिसांना आढळले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुलांना मानवी ढाल म्हणून वापर करीत रोहितने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.