वादग्रस्त सेलिब्रिटी गेम शो ‘बिग बॉस ७’ मधील गौहर, एजाझ, संग्राम, अॅण्डी आणि तनिषा या अंतिम पाच स्पर्धकांची आजची रात्र कबुलीजबाबाची रात्र आहे. यावेळी स्पर्धकांना ‘बिग बॉस’च्या कन्फेशन रूम ऐवजी खुल्या जागेत अन्य स्पर्धकाविषयीचा आपला कबुलीजबाब नोंदवायचा आहे. यावेळी घरातील सदस्य त्यांच्या मनातील अन्य स्पर्धकाविषयीच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचा कबुलीजबाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. घरातील सदस्यांच्या मागे त्यांच्या विषयी बोललेल्या गोष्टींचा कबुलीजबाब देण्यास ‘बिग बॉस’ स्पर्धकांना सांगतो.

संध्याकाळी गौहर, एजाझ, संग्राम, अॅण्डी आणि तनिषा ‘लिव्हिंग एरिया’मध्ये जमतात आणि एकमेकांविषयीची मनातील भडास व्यक्त करतात. प्रथम अॅण्डीपासून सुरूवात होते. आपल्याला कुशाल कधीही आवडला नसल्याचे तो गौहरला सांगतो. त्याचबरोबर तिच्या आणि कुशालच्या ‘रिलेशनशिप’च्या भवितव्याबाबतदेखील आपल्याला नेहमीच शंका वाटल्याचे सांगतो.

तनिषाचे त्याच्याशी भांडण करणे आणि त्यांच्यातील छोट्या गोष्टीचा बागुलबुवा करणे आवडत नसल्याचे तो तनिषाला सांगतो. तनिषाचा थंड प्रतिसात आपल्याला आवडत नसल्याचे एजाझ तनिषाला सांगतो. या संधीचा फायदा घेत तो गौहर खानशी तुटलेले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. संग्राम नेहमीप्रमाणे कोणालाही न दुखविण्याचा पवित्रा घेत, गौहरविषयी आपण जे काही बोललो तो खेळाचा एक भाग असल्याचे सांगतो.

परंतु, गौहर आणि तनिषाच्या कबुलीजबाबाचे वादात रुपांतर होते. दोघी एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप करतात. ‘बिग बॉस’च्या या पर्वात घरातील सदस्यांचे वाईट पैलू प्रकर्षाने निदर्शनास आले. ‘बिग बॉस’च्या शेवटच्या अठवड्यात कोणते नवीन धक्के बसणार आहेत, ते अनुभवणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.