भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो सुरूवातीपासूनच अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. या शोमधील नाट्य, सेलिब्रिटींचे नखरे, त्यांच्यातील भांडण-तंटे या सगळ्यामुळे टीआरपीच्यादृष्टीने ‘बिग बॉस’ला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. येत्या काही दिवसांतच ‘बिग बॉस’चा आठवा सिझन येऊ घातलाय. त्यामुळे पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात कोण असणार किंवा यंदा या कार्यक्रमात नवे काय पहायला मिळणार याबद्दलच्या चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे. ‘बिग बॉस- ८’ ची तयारी अंतिम टप्प्यात असली तरी यंदाच्या स्पर्धकांची नावे अजूनपर्यंत तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. मात्र, एकुणच या ‘बिग बॉस’ची वादग्रस्त पार्श्वभूमी पाहता, या रिअॅलिटी शोमध्ये कोण सहभागी होऊ शकते, याबद्दल व्यक्त केलेला हा अंदाज…

शांताकुमारन श्रीशांत- ‘वाद’ या शब्दाची नेमकी व्याख्या शोधण्यासाठी तुम्ही डिक्शनरी उघडलीत तर, वाद या शब्दापुढे तुम्हाला श्रीशांतचे छायाचित्र छापण्यात आलेले दिसले. आजपर्यंत क्रिकेटपेक्षा अन्य कारणांमुळेच श्रीशांत अधिक चर्चेत राहिला आहे.

साजिद खान-  नुकताच येऊन गेलेला ‘हमशकल्स’ हा चित्रपट बघताना चित्रपटगृहात प्रेक्षकांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या त्याची भरपाई म्हणून चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानला ‘बिग बॉस’च्या घरात पाठवलेच पाहिजे.

पूनम पांडे- सोशल मीडियावरील खमंग चर्चांमध्ये पूनम पांडे हे नाव हमखास घेतले जाते. पूनमचे बोल्ड फोटोज, बेधडक विधाने या सगळ्यामुळे ट्विटरवरील पूनमच्या फॉलोअर्सची संख्या काही कमी नाही. इंडस्ट्रीमध्ये पूनम पांडे या नावाला कोणी फारसे विचारत नसले तरी, तिचे ट्विटर अकाऊंट म्हणजे सणसणीत बातम्या मिळवण्याचे हक्काचे ठिकाण समजले जाते. त्यामुळे वादग्रस्तपणा हा समान दुवा ग्राह्य धरल्यास ‘बिग बॉस’मध्ये पूनम पांडेच्या ट्विटर अकाऊंटचा समावेश होणे अनिवार्य आहे.

जेम्स अँडररसन- जेम्स अँडररसन- भारतीय खेळाडूंशी तंटा करण्याऱ्यांपैकी हा एक आहे आणि ‘बिग बॉस’ हा शो तंट्यावरच आधारित आहे. त्यामुळे जेम्स अँडरसनला ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश दिला पाहिजे.

मारिया शारापोव्हा- मी सचिन तेंडुलकरला ओळखत नाही, या विधानामुळे मारिया शारापोव्हा काही दिवसांपूर्वी भारतीयांच्या टीकेचे लक्ष्य ठरली होती. तेव्हा मारियाचा ‘बिग बॉस’मध्ये समावेश केल्यास, तिच्या भारताबद्दलच्या एकूणच अज्ञानामुळे शोला आणखी प्रसिद्धी मिळू शकते.

कांदा- भारतीय जनता आणि महागाई यांच्याशी भावनिक नाळ जोडला गेलेला आणखी एक घटक म्हणजे कांदा. आपल्या कुवतीचा चांगलाच अंदाज आल्याने सध्या कांद्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. आपली किंमत कशी वाढवावी, याचे कसब कांद्याला चांगलेच अवगत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’मध्ये कांदा चांगलच भाव खाऊन जाईल यात शंका नाही.

ट्रांझिस्टर- बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘पीके’ या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित झाल्यानंतर ट्रांझिस्टर अनेक वाद आणि स्कँडलचे उगमस्थान म्हणून ओळखला जात आहे. ‘बिग बॉस’चा आठवा सिझन यशस्वी होण्यासाठी अशाच वादग्रस्त गोष्टींची गरज असल्यामुळे ट्रांझिस्टरचे बिग बॉसच्या घरातील स्थान निश्चित मानले जात आहे.