‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. महेश मांजरेकर यांनी या कार्यक्रमाच्या तीन पर्वांचे सूत्रसंचालन केले होते. कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीने सोशल मीडियावर काही व्हिडीओ पोस्ट करत नव्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा केली आहे. बिग बॉस मराठीचे चाहते चौथ्या पर्वाची आतुरतेने वाट बघत आहेत.

काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीच्या सोशल मीडिया हँडल्सवर काही व्हिडीओ पोस्ट केले गेले. त्यात महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाबद्दल बोलताना दिसत आहेत. महेश मांजरेकर हा कार्यक्रम सोडणार असल्याचे म्हटले जात होते. त्यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला होता. मी बिग बॉसच्या तीन पर्वांसाठी करारबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पण सोशल मीडियावरील या व्हिडीओंमुळे सूत्रसंचालनाशी निगडीत अफवांना पूर्णविराम लागला आहे.
आणखी वाचा- ‘लायगर’च्या अपयशानंतर सहनिर्मातीचा सोशल मीडियाला रामराम, म्हणाली “जगा आणि…”

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व गेल्या गणेशोत्सवाच्या वेळी २६ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाले होते. त्याच धर्तीवर नवे पर्व येत्या ११ सप्टेंबरला सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असल्याची माहिती समोर आली होती. पण त्यासंबंधित कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसल्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलला आहे असे म्हटले जात आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीच्या आसपास कार्यक्रम सुरू होणार असे म्हटले जात होते. करोना निर्बंध नसल्यामुळे या वर्षीचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. या काळात अनेक सेलिब्रिटी कामात व्यग्र असतात.

आणखी वाचा- बिग बॉस मराठीचं चौथं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, महेश मांजरेकर यांचा व्हिडीओ चर्चेत

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींच्या बिझी शेड्युलमुळे कार्यक्रम प्रसारित होण्यास विलंब झाला आहे असे म्हटले जात असले तरी खरे कारण अद्यापही समोर आलेले नाही. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये कोणते कलाकार सहभागी होणार आहेत याची माहिती पुढच्या काही दिवसात येऊ शकते. चाहत्यांमध्ये नव्या पर्वाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सुरू होऊ शकते.