छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाची ओळख आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा शो घराघरात लोकप्रिय आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये होणारे राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा महेश मांजरेकर चौथ्या पर्वासाठी सुत्रसंचालकाची भूमिका निभावताना दिसणार आहेत. त्यांचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वासाठी सुत्रसंचालन करणार की नाही याबाबत जोरदार चर्चा होती. याबाबत उलट सुलट चर्चा झाल्या आणि अखेर मांजरेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आता त्यांचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. ज्यात बिग बॉसच्या चौथ्या पर्वाबद्दल बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी त्याला, ‘आता फुल टू धमाल, राडा, एन्टरटेन्मेंट आणि महेश सरांची शाळा… सीझन ४ फुल टू राडा असणार बॉस…’ असं कॅप्शन दिलं आहे.
आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार ‘हे’ कलाकार ? संभाव्य नावाची यादी समोर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महेश मांजरेकर प्रेक्षकांची प्रत्येक पर्वातील सदस्यांबद्दल काय मतं असतात याबद्दल बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात, “हिची ना कायम किरकीर असते, हा नेहमी किती भांडतो, सर ना तिच्यावर कायम चिडतात, हा सरांचा ना आवडता आहे. ही माझी नाही तुमची सर्वांची मतं आहे. बिग बॉस मराठी ४ सुरू होतोय. तुमची मतं तयार ठेवा.” महेश मांजरेकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असला तरीही हे पर्व कधी सुरू होणार याच्या तारखेचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही.

आणखी वाचा- पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याआधीच अभिनेता प्रतीक बब्बर पुन्हा पडला प्रेमात, करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात कोणते कलाकार असणार याची एक संभाव्य यादी समोर आली आहे. या यादीत अलका कुबल, शुभांगी गोखले, हार्दिक जोशी, प्राजक्ता गायकवाड, किरण माने, नेहा खान, सोनल पवार, रुचिरा जाधव, शर्वरी लोहकरे, यशोमन आपटे, निखिल चव्हाण, अनिकेत विश्वासराव, दिप्ती लेले, ओमप्रकाश शिंदे आणि माधव अभ्यंकर यांचा समावेश आहे. मात्र कलर्स मराठी वाहिनी अथवा संबंधीत कलाकारांकडून याची पुष्टी झालेली नाही.