गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. या भाषावादामुळे राजकीय वातावरणसुद्धा चांगलंच तापलं आहे. त्यातच सोशल मीडियावर मराठी लोकांकडून अमराठी लोकांना मारहाण केल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे हा संघर्ष अधिकच वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवाय काहीजण हट्टाने मराठी बोलणार नसल्याचं चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. अशातच रितेश देशमुखचा पापाराझीबरोबरच्या मराठी संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरुन रील्स स्टार पुनीतने रितेशला चांगलंच सुनावलंय. याचा व्हिडीओ पुनीतने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये पुनीत रितेशबद्दल असं म्हणतोय, “तू मराठी भाषेला पाठिंबा देत आहेस हे ठीक आहे, आम्हीसुद्धा मराठी भाषेला पाठिंबा देत आहोत. पण, कोणी तुझ्याबरोबर हिंदीमध्ये बोलत आहे; तर त्याचा अपमान करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? आणि तुला तरी कुठे मराठी येतं? तू स्वतःसुद्धा इंग्रजी शाळेत शिकला आहेस आणि तू ख्रिश्चन मुलीबरोबर लग्न केलं आहेस.”
पुनीतच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत त्याला सुनावलं आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवारनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धनंजय पोवारने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून धनंजयने रितेशची बाजू घेत पुनीतवर टीका केली आहे.
या व्हिडीओत तो असं म्हणतोय, “या पुनीत सुपरस्टारला अक्कल असली पाहिजे, ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय, त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहीत आहे का? घरच्यांबरोबर आणि आपल्या मुलांबरोबर ते ज्याप्रकारे वागतात, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याकडे एक संस्कारी व्यक्ती म्हणून आम्ही पाहतो. आम्ही त्यांना आदर्श मानतो. शिवाय महाराष्ट्रातीलही बरेच जण त्यांना आदर्श मानतात.”
यानंतर धनंजय असं म्हणतो, “पुनीत तू त्यांना (रितेश देशमुख) कोणत्या थराला जाऊन बोलत आहेस. तुझी लायकी नसताना तू बोलू नकोस. लायकी हा शब्द वापरणं चूक आहे; पण तूझे जे व्हिडीओ बनवतोस, त्यातून तुझे विचार कळतात. त्यामुळे तू त्यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट नको बोलूस.”