बिग बॉस मराठीमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता पुष्कर जोग सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. पुष्कर आणि त्याची पत्नी जास्मिन ब्रह्मभट्ट यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या अफवांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जोर आला आहे. इतकंच नाही तर या मतभेदांमागे सई लोकूर कारण असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र या साऱ्यावर पुष्करने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर उठत असलेल्या अफवांमध्ये तथ्य नसल्याचं त्याने सांगितलं आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये सहभागी झालेले स्पर्धक सई लोकूर आणि पुष्कर जोग यांचं घरातील वर्तन साऱ्यांनीच पाहिलं होतं. त्यामुळे पुष्कर आणि जास्मिन यांच्या नात्यात वितुष्ट येण्यामागे सई लोकूर मुख्य कारण असल्याची चर्चा आहे. त्यातच काही दिवसापूर्वी पुष्करने त्याचा वाढदिवस साजरा केला, या बर्थ डे पार्टीमध्येदेखील जास्मिन कुठेही दिसून आली नाही. त्यामुळे पुष्कर आणि जास्मिन यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

या चर्चा रंगत असतानाच जास्मिने सोशल मीडियावरुन तिचे आणि पुष्करचे काही फोटोही डिलीट केल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही, तर या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चांनाही उत आला होता. मात्र आता या साऱ्यावर पुष्करने मौन सोडलं आहे.

“आमच्या नात्यावर चर्चा करणारे हे ट्विट माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी आहे.सोशल मीडियावर अशा अफवा परसविण्यासाठी या ट्रोलर्सला नक्की कोण पैसे पुरवतं कोणास ठाऊक, आमच्या नात्याविषयी होत असलेल्या चर्चा खोट्या आहेत”, अशी प्रतिक्रिया पुष्करने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिली आहे.

पुढे तो म्हणतो, “माझी बायको, मुलगी आणि आईसोबत माझं नातं कसं आहे, हे कोणालाही सांगण्याची मला गरज वाटत नाही आणि ते सांगायला मी कोणाला बांधीलही नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्याचा मान राखा आणि माझ्या कुटुंबाला कोणत्याही प्रकरणात अडकवू नका. माझ्या कुटुंबाला मीडियापासून दूर रहायचं आहे”.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये सहभागी झालेला पुष्कर सई लोकूरमुळे चांगलाच चर्चिला गेला होता. घरात आणि घराबाहेर या दोघांच्या मैत्रीची विशेष चर्चा रंगली होती. त्यामुळे या दोघांमुळेच पुष्कर आणि जास्मिनमध्ये काही तरी अलबेल झाल्याचं सांगण्यात येत होत. मात्र या साऱ्यावर पुष्करने प्रतिक्रिया देत साऱ्यांची तोंड बंद केली आहेत.