नवरात्र म्हणजे सर्वसामान्यांच्या लेखी घट बसणं, देवीची उपासना, गरबा खेळणं, उपवास करणं.. तुमच्या आवडत्या सेलेब्रिटींच्या दृष्टीने नवरात्र म्हणजे नेमकं काय? आपल्या कामाच्या धबडग्यातून ते हे सगळं एन्जॉय करतात का? आणि करत असतील तर कसं करतात हे जाणून घेऊयात. नवरात्र हा उत्सव कसा साजरा करतो याबद्दल ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरेने सांगितले आहे.

शिव ठाकरे-

गणपती बाप्पावर आणि देवीवर माझी खूप श्रद्धा आहे. घरापासून पाच-सहा किलोमीटरवर असलेल्या देवीच्या मंदिरात मी दर मंगळवारी न चुकता जातो. अगदी शाळेत असल्यापासूनची ही सवय आहे. शाळेत असताना सायकलवरून जायचो. आता कधी मुंबईतून परत येताना उशीर झाला, रात्रीचा एक वाजला आणि मंदिर बंद झालं तरी मी पायरीवर डोकं टेकवून येतो, पण अमरावतीत असताना मी मंगळवारी देवीच्या दर्शनाला गेलो नाही, असं शक्यतो होत नाही.

अमरावतीत अंबामातेचं सुंदर, प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे इथे नवरात्र हा खूप महत्त्वाचा उत्सव असतो. दिवाळीएवढय़ाच उत्साहात नवरात्र साजरी होते. पहाटे साडेचारपासून भाविकांची रीघ लागते. आमच्या लहानपणी अमरावतीत गरबा-दांडियाचं फारसं प्रस्थ नव्हतं, पण नवरात्रीत ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत. गणपती, नवरात्रीतल्या अशा कार्यक्रमांमध्ये मी अनेकदा सहभागी झालो आहे. पाचवी-सहावीत असताना उन्हाळी शिबिरांमध्ये नृत्य आणि अभिनयाशी ओळख झाली आणि हे आपल्याला जमतं, आवडतं हे लक्षात आलं. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सवांत कार्यक्रम सादर करू लागलो. त्यात मिळणाऱ्या बक्षिसांमुळे आणि होणाऱ्या कौतुकामुळे प्रोत्साहन मिळत राहिलं. लोक ओळखू लागले, ते मला खूप आवडायचं.

मराठी बिग बॉसमुळे मी आता घराघरांत पोहोचलो आहे. पूर्वी अमरावतीपुरतंच मर्यादित असलेलं माझं विश्व ‘रोडीज’नंतर विस्तारलं. त्यामुळे नवनवीन संधी मिळू लागल्या. गुजरातमध्ये नवरात्रीचा विशेषत: गरबा-दांडियाचा उत्साह किती मोठा असतो, ते तिथे पाहुणा म्हणून निमंत्रित केलं गेल्यामुळे कळलं. तिथे एवढी गर्दी होती, की लोकांबरोबर गरबा खेळणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मला स्टेजवरच परफॉर्म करावं लागलं. पण गरबा खेळण्याची मजा स्टेजवर नाही. जिथे आपण सेलिब्रिटी नसतो, आसपास कॅमेरे नसतात, तिथे जवळच्या मित्रांबरोबर, लोकांमध्ये मिसळून गरबा-दांडिया खेळण्यातच खरा आनंद आहे.

आमच्या घरी घट बसवले जातात. आई टोपलीत धान्य रुजवते. नऊ दिवस दिवा अखंड तेवत ठेवला जातो. अतिशय भक्तिमय वातावरणात नवरात्र साजरी होते. नंतर तो दिवा नदी किंवा तलावात सोडला जातो. नवरात्रीत अनेक जण नऊ दिवस कडक उपवास करतात. काही जण अनवाणी चालतात. मी यातलं काहीही करत नाही. वेळ पडली, तर मी काही न खाता-पिता राहू शकेन, पण एरवी शरीराला अन्नापासून वंचित ठेवणं मला पटत नाही. त्यामुळे मी उपवास वगरे करत नाही. मनातला भाव महत्त्वाचा, यावर माझा विश्वास आहे.