बॉलिवूडमध्ये असे फार मोजके कलाकार आहेत जे त्यांच्या कॉमेडीच्या अचूक टाइमिंगसाठी ओळखले जातात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता जावेद जाफरी. धमाल, डबल धमाल, थ्री इडियट्स या चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या जावेदचा आज वाढदिवस. ४ डिसेंबर १९६३ मध्ये मल्लिवाला येथे जन्म झालेल्या जावेदने चित्रपटसृष्टीमध्ये स्वत: स्वतंत्र असा ठसा उमटविला आहे. जावेद केवळ एक उत्तम कॉमेडियन नसून तो मल्टी-टॅलेंटेड स्टारदेखील आहे. मात्र त्याच्याविषयी फार कमी जणांना माहित आहे.
‘शोले’ चित्रपटातील सुरमा भोपाली साऱ्यांनाच आठवत असेल. ही भूमिका लोकप्रिय अभिनेता जगदीप यांनी साकारली होती.त्याच जगदीप यांचा मुलगा म्हणजे जावेद जाफरी. आपल्या वडिलांकडून जावेदला अभिनयाचा वारसा मिळाला. वडिलांप्रमाणेच तोदेखील विनोदाचा अचूक टायमिंग साधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. जावेदने त्याच्या अभिनयाची कक्षा केवळ विनोदी भूमिकांपर्यंतच मर्यादित न ठेवता त्याच्या अभिनयाच्या कक्षा रुंदावल्या. जावेदने विविधांगी भूमिका साकारत स्वत:ला सिद्ध केलं.
नायक, खलनायक, विनोदी अभिनेता, एक उत्तम डान्सर, वीजे,वॉइस एक्टर अशा अनेक भूमिका त्याने पार पाडल्या. विशेष म्हणजे तो एक उत्तम डान्सर असून त्याच्यामुळेच आज घराघरामध्ये डान्स पोहोचल्याचं म्हटलं जातं. त्याचा ”बुगीवुगी” हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सोनी टीव्हीवर १९९६ साली सुरु झालेल्या या शोने अनेक लोकांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी दिली.
वाचा : Photo : ‘शोले’ मधील सुरमा भोपाली पाहा आता कसे दिसतात
१९८५ मध्ये आलेल्या ‘मेरी जंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जावेदचं १’०० डेज’, ‘ओह डार्लिंग ये है इंडिया’, ‘बूम’, ‘सलाम नमस्ते’, ‘ता रा रम पम’, ‘सिंग इज किंग’, ‘धमाल’, ‘डबल धमाल’, ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील भूमिकांचं विशेष कौतुक झालं. मात्र तो खऱ्या अर्थाने रमला तो डान्समध्येच. हृतिक, टायगर किंवा शाहिद येण्यापूर्वीचा इंडस्ट्रीमधला सर्वोत्तम डान्सर म्हणून जावेदकडेच पाहिलं जायचं. त्याने भारतीय सिनेमातला पहिला ब्रेक डान्सर म्हणून बिरुद पण मिळालं. त्याचं नृत्यावर प्रचंड प्रेम असून आजही तो खासकरुन त्याच्या डान्ससाठी ओळखला जातो.