काळाच्या पोटात अनेक आठवणी दडलेल्या असतात. आपण एक काळ जगून जातो, आजुबाजूला अनेक घटना घडतात. वर्तमानपत्रांचे मथळे होतात. एका कुठल्याशा निमित्ताने इतिहासाची ती पानं पुन्हा समोर येतात. या भूतकाळातल्या घटना चांगल्याच असतात असं नव्हे, घडलेल्या भयानक गुन्ह्यांच्या रूपात काळाच्या पटलावरचे ओरखडेही असू शकतात. १९७०-८० च्या दशकांतला हा काळ ज्यांनी पाहिलाय त्यांना विक्रमादित्य मोटवाने आणि सत्यांशू सिंग यांची ‘ब्लॅक वॉरंट’ ही वेबमालिका अधिक भावेल. तिहार हा भारतातल्या सर्वात मोठ्या तुरुंगातल्या त्या काळातल्या ‘आतल्या’ गोष्टी ब्लॅक वारंट सांगते. त्यामुळे जे तत्कालीन घटनांविषयी अनभिज्ञ असतील त्यांनाही ही मालिका आवडेल.

सुनील गुप्ता १९८० च्या दशकात तिहार तुरुंगाचे जेलर होते. त्यांचे अनुभव त्यांनी आणि पत्रकार सुनेत्रा चौधरी यांनी ‘ब्लॅक वॉरंट : कन्फेशन्स ऑफ ए तिहार जेलर’ या पुस्तकरूपाने जगासमोर आणले. त्यावर ही वेबमालिका आधारित आहे. बाहेरच्या जगाला माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही, अशा त्या काळातल्या तिहार तुरुंगातल्या आतल्या कुरापती, गँगवॉर, तुरुंगाच्या जेलरना तेव्हा नसलेली प्रतिष्ठा, अत्यंत क्रूर, घृणास्पद गुन्ह्यांमागची गुन्हेगारांची मानसिकता या मालिकेत चित्रित होते. ही मालिका सात भागांचीच आहे. टोकाची उत्कंठा जागवणारी आहे, असे म्हणता येणार नाही. कारण त्या काळानुसार तिचा आपला एक वेग आहे. तिहार तुरुंगाचेच आपण एक भाग होऊन जाण्यासाठी पहिले दोनेक एपिसोड तरी जाऊ लागतात, त्यानंतरच आपण तुरुंग अधीक्षक सुनील गुप्ता यांच्याबरोबर ‘तिहार’मय होऊन जातो.

ब्लॅक वारंट सीरिजचा यूएसपी म्हणजे तिहारमध्ये शिक्षा भोगत असलेला कुख्यात कैदी चार्ल्स शोभराज. पहिल्या भागापासून तिहारमधला शोभराजचा वावर कथेत डोकावत राहतो. मालिकेचा पुढचा सीजन त्याच्यावरच केंद्रित असावा. या वेबसीरिजचं नाव ब्लॅक वॉरंट म्हणजेच डेथ वॉरंट. फाशी सुनावलेल्या कैद्यांच्या शिक्षेची अंमलबजावणीची या सीरिजमध्ये दाखवलेली प्रक्रिया अंगावर शहारे आणते. तिहारमध्ये सुनील गुप्ता यांच्या कार्यकाळातली गाजलेली फाशी होती – रंगा आणि बिल्ला या गुन्हेगारांची. त्यांच्या फाशीचा एपिसोड खास आहे.

आयुष्यात अत्यंत क्रूर गुन्हे करून आलेले, निर्ढावलेले कैदी तुरुंगात शिक्षा भोगत असतात. ते अर्थात शांतपणे तर तिथे राहणार नाहीत, हे आपण अनेक सिनेमांमध्ये पाहिलेले आहे. पण ब्लॅक वारंटच्या कथेला सत्यकथांची जोड असल्याने ती आपलं वेगळेपण जपते. तिहारमध्ये तेव्हा जाती-धर्मावर आधारलेल्या तीन वेगवेगळ्या गँग सक्रिय होत्या. अनेक काळे धंदे तुरुंगात राजरोस सुरू होते. भ्रष्टाचार तर होताच, पण भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही कैद्यांचं भय होतं. तुरुंगातल्या अधिकाऱ्यांना कैद्यांमुळे कोणत्या समस्या येतात त्याचंही चित्रण यात आहे. पुस्तकावरून सीरिज बनवताना आणि तेही विशिष्ट काळातील चित्रण असेल तर अनेक गोष्टींचं व्यवधान दिग्दर्शकाला ठेवावं लागतं. ते यात ठेवलं गेलं आहे, याचं श्रेय विक्रमादित्य मोटवाने यांना जातं.

कथा, पटकथा, दिग्दर्शनाची बाजू खमकी असताना अभिनेत्यांपुढचं आव्हान वाढतं. पण सर्वच कलाकारांचा दमदार अभिनय ही ब्लॅक वॉरंटची आणखी एक जमेची बाजू. अभिनेता शशी कपूरचा नातू जहान कपूरने जेलर सुनील गुप्ता यांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.

ज्याला क्राइम स्टोरीज पाहायला आवडतात, त्यांच्या बिंज वॉचसाठी ‘ब्लॅक वॉरंट’ मस्ट वॉच आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Story img Loader