काय गंमत आहे बघा, आमिर, सलमान, शाहरुख खान, अक्षयकुमार आणि अजय देवगण या ‘टॉप फाईव्ह’ हिरोंचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जन्माला आलेली पिढी आज तारुण्यात आलेली असताना ही पिढी याच नायकांच्या प्रत्येक नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतेय नि त्यांचा प्रत्येक चित्रपट किमान एकदा तरी पाहतेय.  रसिकांच्या दोन पिढ्या ओलांडून देखील हेच ‘हीरो’ आकर्षणाचा केंद्र का व कसे बरे राहिलेत? रणवीर सिंह, ह्रतिक रोशन, रणबीर कपूर हे या हिरोंच्या नंतरच्या काळातील हिरो आपल्या चालीने चाललेत. पण त्या ‘हम पांच’ची गोष्टच वेगळी. प्रत्येकाने आपला एक हुकमी प्रेक्षक वर्ग निर्माण करून तो टिकवलाय देखील. कोणता चित्रपट रसिकांना आवडेल वा न आवडेल हे चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो सुटल्याशिवाय समजत नाही, अशा व्यवसायात इतके टिकून राहणे अजिबात सोपे नाही. त्यासाठी अभिनय, समज व क्षमता यासह आणखीन बरेच काही असावे लागते अथवा नसेल तर आत्मसात करावे लागते. यात कळत नकळत शाहरुख खान ‘महागुरु’ म्हणायला हवा. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात लोकप्रिय हिरो केवढे तरी. दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर या त्रिमूर्तीचा ठसा आजही कायम आहे. राजेश खन्ना- अमिताभ बच्चन तर सुपरस्टार. बिग बींनी वय व काळ यासह स्वतःला बदलवत ठेवले. तरी आजच्या टॉप फाईव्ह हिरोंची यशोगाथा काही वेगळीच. अर्थात यातील कोणालाच आपल्या पहिल्याच चित्रपटापासून व्यावसायिक सूर सापडलेला नाही. सलमान, आमिर, अजय यांचे पिता याच माध्यमातील. त्यामुळे या क्षेत्राचे बाळकडू त्याना घरातून मिळत गेले. शाहरुख- अक्षयच्या बाबतीत तसेही काही नाही. पण या क्षेत्रात पार्श्वभूमीपेक्षा स्वतःला घडवणे अत्यंत महत्त्वाचे असते. आणि हे घडवणे एकाच वेळेस विविध स्तरावर असते. चित्रपटाच्या निवडीपासून त्याच्या प्रदर्शनापर्यंत ते येते. ते करतानाच आपण याच स्पर्धेतील अन्य हिरोंपेक्षा काही वेगळेच करतोय असा आपल्या चाहत्यांना विश्वास द्यावा लागतो. यात शाहरुख सर्वांचाच महागुरु ठरावा. त्याने बिग बॅनर्सच्याच चित्रपटातूनच भूमिका करण्यास कायम प्राधान्य दिले. नेमक्याच चित्रपटातून काम करीत राहिल्याने शाहरुख व आमिरच्या चित्रपटाची आवर्जून वाट पाहायची रसिकांना लागलेली सवय प्रत्येक चित्रपटाच्या पथ्यावर पडते आहे. यांच्या तुलनेत सलमान थोडे अधिक चित्रपट करतो. पण आपले अतिदर्शन न होण्याचीही काळजी घेतो. या तिघांची खास वैशिष्ट्ये इतक्यावरच थांबत नाहीत. त्यांच्या नवीन चित्रपटाची पूर्वप्रसिध्दी खूप अगोदरपासून सुरु होते. आणि थोड्याच दिवसांत हे हिरो व चित्रपटाचे नाव याभोवतीच सगळी प्रसिद्धी केद्रित होते. त्यांच्या चित्रपटाचा दिग्दर्शक व नायिका अनेकदा तरी बाजूला पडतात. हे मुद्दाम घडते की हे हिरोच या चित्रपटाला हमखास यश मिळवून देणार आहेत या वस्तुस्थिती व विश्वासातून तसे होते याचेही उत्तर नकोय. आणखी कितीतरी बारकावे यात आहेत. शाहरुखला खान आडनावावरुन न्यूयॉर्कच्या विमानतळावर अडवले याच घटनेचा फायदा घेत ‘माय नेम इज खान’ चित्रपटाची पूर्वप्रसिध्दी सुरु झाली. ‘सुल्तान’ प्रदर्शित व्हायच्या दोनच दिवस अगोदर झालेल्या ‘दंगल’च्या पहिल्याच पत्रकार परिषदेत आमिरने म्हटलं की ‘सुल्तान’ पाहायला होणार्‍या हाऊसफुल्ल गर्दीला ‘दंगल’चेही पोस्टर पाहायला मिळेल आणि आमच्याही चित्रपटाची प्रसिद्धी होईल. विशेष म्हणजे ‘दंगल’च्या पहिल्याच पत्रकार परिषदेतील दिग्दर्शक तिवारी त्यानंतर चित्रपट खणखणीत यशस्वी ठरला तरी कुठेच दिसला नाही. ‘सुल्तान’च्या पूर्वप्रसिध्दीत अनुष्का शर्माला तरी फारसे स्थान कुठे हो मिळाले? ‘ट्यूबलाइट’च्या एकूणच पूर्वप्रसिध्दीचा भार सलमानने पेलला. पहिल्याच पत्रकार परिषदेत सलमानने सगळाच ‘फोकस’ आपल्यावरच राहिल याच दृष्टीने बोलणे/ ऐकणे/पाहणे ठेवले. सायकलवरून जा, मेहबूब स्टुडिओतून रिक्षातून घरी जा अशा अगदीच छोट्या वाटणार्‍या गोष्टीतूनही त्याने चित्रपट चर्चेत ठेवला. चित्रपटासह स्वतःलाही सतत प्रकाशात ठेवण्याची खुबी वा चातुर्य या खानदानी हिरोनी आत्मसात केलंय. आपला चित्रपट पाहायला येणारा प्रेक्षक आपल्यालाही पाहण्यास अधिकच उत्सुक आहे यावरचा त्यांचा विश्वास थक्क करणारा आहे. गंमत म्हणजे साठच्या दशकात लीडर, दिल दिया दर्द लिया, आदमी, संघर्ष या चित्रपटाच्या वेळेस दिलीप कुमारने असे सगळेच आपल्याच भोवती ठेवले तेव्हा दिलीप कुमार पडद्यापेक्षाही मोठा होतोय अशीच जोरदार टीका झालीच व हे सगळेच चित्रपट फ्लॉप ठरले. दिलीप कुमार दिग्दर्शकालाही गुंडाळून ठेवतो असे म्हटले गेले. हे तीनही खान अधूनमधून तेच करतात ना? त्यांच्या चित्रपटाच्या पोस्टरलाही ते कानाकोपऱ्यातून जणू व्यापून टाकतात आणि चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या तीन दिवसांच्या उत्पन्नाच्या बातम्या गाजताना सगळेच श्रेय या खाननाच तर जाते.

या खान हिरोनी आपले ब्रॅण्ड नेम तयार करताना चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे काहीसे बाजूला तर पडले नाही ना? यांचा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या वेळेस प्रसार माध्यमात मुखपृष्ठापासून सोशल नेटवर्किंग साइटवर सगळीकडेच फक्त हेच. या ट्रॅफिक जामचा मराठी चित्रपटालाही फटका बसतोच पण यांच्या चित्रपटांच्या स्पर्धेत दोन आठवडे तरी कोणताच मराठी चित्रपट प्रदर्शित होत नाही. गल्ला पेटीवरचा हा या तीन खानांचा दबदबा कमालीचा कौतुकास्पद आहे. ‘प्रेम रतन धन पायो’ फारसा चांगला नाही असे प्रेक्षकांनीच म्हटले तरी त्याने विक्रमी कमाई केलीच. म्हणजेच ज्याला आपण फ्लॉप म्हणतो ते या खान हिरोंच्या आसपास फिरायला तयार नाही. ‘फॅन’ला तसे फारसे यश मिळाले नसेलही पण तो छोट्या बजेटचा चित्रपट होता हे सांगायलाच हवे. या तिघांच्या तुलनेत अजय- अक्षय थोडे मागे असतील पण तेही या तिघांकडून स्वतःचे मार्केटिंग कसे करायचे, आपलाच चित्रपट चर्चेत कसा ठेवायचा या गोष्टी शिकलेत असे दिसते. आणि त्यात चूक देखील काहीही नाही. मॉल मल्टिप्लेक्सच्या काळात ब्रॅण्ड नेम अतिशय महत्त्वाची गोष्ट झालीये आणि त्यालाच हे हिरो चतुरता व डावपेच याने खेळवतात. ते देखील रुपेरी कारकिर्दीची २५ वर्षे झाल्यावर व वयाच्या पन्नाशीच्या आतबाहेर! चित्रपटाच्या निर्मितीमधील त्यांचा सहभाग, या प्रत्येकाची कौटुंबिक गाथा (सलमान तर अविवाहित) त्यांच्याभोवतीचे गरमागरम गॉसिप्स, या प्रत्येकाची विविध गोष्टी सांभाळणारी टीम अशा अनेक गोष्टींचाही यांच्या यशात वाटा आहेच. यशस्वी कलाकाराच्या मागे वा अवतीभवती व्यावसायिक वृत्ती व दृष्टी असणारी टीम असावीच लागते पण त्याच्या नेमणुकीचे श्रेय या हिरोनाच द्यायला हवे. स्टारडम ही गोष्ट टिकवणे चित्रपटाच्या यशासह अनेक गोष्टींवरही असते हे शाहरूख खानचा कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा मालक, आमिर खानचा पाणी फाऊंडेशनमधील सहभाग, सलमानची बीईंग ह्युमन सेवा या गोष्टींतूनही स्पष्ट होतेय. या प्रत्येकानेच आपली शरीर संपदा, व्यक्तिमत्त्वातील ताजेपण व आकर्षण आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपणाला अजूनही प्रेक्षक हिरो म्हणून पाहू शकतात असा टिकवलेला विश्वास अशा अनेक गोष्टी यात सामावल्यात. चित्रपटसृष्टीतील यश कधीच सरळ रेषेत जाणारे नसते पण ती रेषा आपल्या इच्छेनुसार जाण्याजोगा आपणच प्रयत्न करावा हेच गेल्या सुमारे २५ वर्षांपासून हिरोगिरी करीत असलेल्या हिरोंचे मोठेच यश आहे…
– दिलीप ठाकूर