कपूर हिरोंचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सिनेमा. सिनेमा म्हणजे त्यांचा जणू श्वास-ध्यास, स्वभाव, एकच लक्ष वगैरे वगैरे आणि त्यांच्या या गुणांचा कधी कुठे कसा छानसा अनुभव येईल हे सांगता येणेही तसे वेगळेच ठरे. शशी कपूर देखील तसाच अस्सल ‘फिल्मवालाज’. हे त्याच्या चित्रपट निर्मिती संस्थेचे नावदेखील. त्याच्या काही अगदी वेगळ्याच आठवणी सांगायला हव्यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शशी कपूरचा लाडका पुतण्या ऋषी कपूरने आपल्या घराण्याच्या आर. के. फिल्म या बॅनरखाली ‘आ अब लौट चले ‘ (१९९९) चित्रपटाचे दिग्दर्शन केले तेव्हाची खास आठवण. त्या चित्रपटात राजेश खन्ना, मौसमी चटर्जी, अक्षय खन्ना, ऐश्वर्य राय इत्यादींच्या भूमिका होत्या. ऋषि कपूरचे हे पहिलेच चित्रपट दिग्दर्शन होय (व तेच एकमेव देखील). या चित्रपटाचे मुंबईतील मेन थिएटर मिनर्व्हा होते आणि आम्हा समीक्षकांसाठी या चित्रपटाचा वेगळा खेळ आयोजित न करता याच मिनर्व्हात ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ला आम्हाला आमंत्रित करण्यात आले. अशा वेळेस एखाद्या चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक समीक्षकांची मते जाणून घेण्यास येथे येतो. पण ‘आ अब लौट चले’च्या मध्यंतरात मिनर्व्हाच्या लॉबीत अनपेक्षितपणे शशी कपूर दिसला व मग ‘चित्रपट कसा जमलाय?’ हे जाणून घेण्यासाठी आम्हा काही निवडक समीक्षकांना भेटला. अशा प्रसंगी शशी कपूरभोवती प्रेक्षकांचा बराच गराडा पडणे अगदी स्वाभाविक होतेच. खरंतर एव्हाना शशी कपूरने चित्रपटातून भूमिका साकारणे जवळपास बंद केले होते आणि आता तो पहिल्यासारखा सडपातळ देखील राहिला नव्हता. आता तो ‘अभिनेता’ शशी कपूर नव्हे तर ऋषि कपूरचा लाडका काका ही भावना व भूमिकेतून हजर होता. त्याला पुतण्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचा पब्लिक रिपोर्ट जाणून घ्यायचा होता. पूर्वी कोणत्याही चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा प्रेक्षकांचा कौल कसा आहे या गोष्टीला खूपच महत्व होते. शशी कपूर याक्षणी ‘एक जागरुक सिनेमावाला’ म्हणूनच हजर होता असेच म्हणता येईल. यासाठी आपण ‘स्टार’ असणे हे विसरणे गरजेचे असते. ते पथ्य जणू शशी कपूरने सांभाळत या क्षणाचा अनुभव घेतला. आजही या क्षणाच्या वेळचे शशी कपूरच्या चेहर्‍यावरचे गांभीर्य आठवतंय. त्यावर पुतण्याच्या दिग्दर्शनाचे कौतुक व चित्रपटाच्या ‘गल्ला पेटी’वरील यशापयाचे असे संमिश्र मिश्रण होते. शशी कपूर या निमित्त मिनर्व्हा थिएटरमध्ये आला हेच केवढे तरी विशेष होते.

तत्पूर्वी खुद्द शशी कपूरने दिग्दर्शित केलेल्या ‘अजूबा ‘ (१९९२) या फॅन्टसी चित्रपटात अमिताभ बच्चन व ऋषि कपूर अशी जोडी होती. तर डिंपल खन्ना व सोनम या नायिका होत्या. शशी कपूर तसा खूपच उशिरा चित्रपट दिग्दर्शनात आला होता. विशेष म्हणजे त्याचाही हा दिग्दर्शनातील एकमेव चित्रपट होय. पण निर्माता म्हणून शशी कपूरने ‘उत्सव’, ‘कलयुग’, ‘विजेता’ अशा समांतर अर्थात नवप्रवाहातील चित्रपटाची निर्मिती करुन आशयघन चित्रपटाची कास धरली होती. पण स्वतः दिग्दर्शक होताच त्याने पारंपरिक लोकप्रिय चित्रपटाला प्राधान्य दिले.

याच शशी कपूरला एकदा राज कपूरने ‘टॅक्सी हिरो’ म्हटले व ते प्रचलित देखील झाले. राज कपूरच्या दिग्दर्शनातील ‘सत्यम शिवम सुंदरम’ (१९७८) या चित्रपटात शशी कपूर व झीनत अमान अशी जोडी होती. आर. के. स्टुडिओ व पुणे येथील राजबाग येथे त्याचे मोठ्या प्रमाणात चित्रीकरण होत होते. पण शशी कपूरचा तो विलक्षण चलतीचा काळ होता. त्यामुळेच तो या सेटवरुन त्या सेटवर असा जणू धावत काम करे. पण राज कपूरला कलाकाराच्या सलग तारखा व त्याने भूमिकेत शिरणे हवे असते. शशी कपूर प्रामाणिकपणे आपले काम करत असला तरी त्याने पुरेसा वेळही द्यायला हवा हीच राज कपूरची अपेक्षा होती. शशी कपूरची एकूणच कार्यशैली पाहून राज कपूरने त्याला ‘टॅक्सी हिरो’ म्हटले. टॅक्सी कशी एक भाडे पूर्ण झाले की मग दुसरे घेते. उमेदीच्या काळात शशी कपूरची अशी धावपळ असायची.
दिलीप ठाकूर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by dilip thakur filmwalas shashi kapoor
First published on: 05-12-2017 at 13:52 IST