एखादा सिनेमा कोणत्यातरी खेळावर आधारित असला तर तो बघायला जायचं का नाही यावर पूर्वानुभवावरून ‘नाही’ असं माझा अंतरात्मा सांगतो. त्यात कुठलातरी खेळच चित्रपटाच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेसारखा केंद्रस्थानी असला तर मी तो बघायला जाणं निक्षुन टाळतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या खेळाच्या शास्त्र, प्रकृतRपासून ते खेळाडूच्या शैली, चालीरिती, लकबी या सगळ्या बाबतRत तो सत्याच्या आसपास नसतो. बॉलीवूडमध्ये खेळाचं एक सुप्तं आकर्षण आहे. बऱ्याच कलाकारांना क्रिकेट, टेनिस वगैरे खेळानी मोहिनी घातली आहे.
‘मी बॉलीवूडमध्ये आलो नसतो तर क्रिकेटर झालो असतो’ हे बऱ्याच कलाकारांचं पेटेंट वाक्य आहे. (कसं काय येव्हढं सगळं जमतं बुवा अॅक्टर लोकांना देव जाणे). तर बरेच चित्रपट अशी कलाकारांची हाऊस भागवण्यासाठी तयार केले जातात. त्यात खेळाच्या सूक्ष्म संकल्पना सोडाच पण सोप्या सोप्या पद्धतींना सुद्धा धाब्यावर बसवलेले असते. हिरो क्रिकेटर दाखवला असला तर त्याची बॅट पकडण्याची पद्धत पाहून हा बॅट हातात घेऊन बॅटिंग करतोय का झाऱ्या हातात घेऊन वडे तळतोय हेच कळत नाही. गोलंदाजी करताना दाखवला तर शंभर मीटर लांबून भरधाव पळत येऊन (म्हणजे दुडू दुडू धावत येऊन) चेंडू अलगद सोडायचा. कुमार गौरवचा १९८४ साली आलेला ऑलराऊंडर चित्रपट असाच डोक्याला ताप देणारा होता. त्यात क्रिकेटच्या बारकाव्यांची ऐशी तैशी केली होती. हमजोली चित्रपटात जितेंद्र आणि लीना चंदावरकर बॅडमिंटन खेळताना ढल गया दिन हो गयी शाम हे गाणं म्हणतात. त्या गाण्यात ढल गया दिन मधला दिन शब्द येई पर्यंत शटल लीना चंदावरकर पर्यंत पोहोचत नाही. हो गयी शाम मधल्या शाम होईपर्यंत जितेंद्रकडे पोहोचत नाही. कारण त्या शब्दांवर गाण्यात शटल चा ‘टूक’असा टेबल टेनिसच्या चेंडू सारखा आवाज होतो. मध्ये तर लीना चंदावरकर शटल येईपर्यंत दोन गिरक्या सुद्धा घेते. (बघा हा टॅलेंट आणि आपण फक्त सिंधू आणि सायना सायना करतो) ‘चक दे’ चित्रपटात देखील शाहरुख कोचपेक्षा स्टाईल आयकॉन शाहरुख खान म्हणूनच जास्त लक्षात राहिला. कारण प्रत्यक्ष फिल्ड हॉकीचा थरार खूप वास्तववादी दाखवलाच नव्हता. चित्रपटाची सगळी शक्ती शाहरुखची हिरोगिरी दाखवण्यासाठी पणाला लागली होती. धोनीच्या सिनेमात मात्र सुशांतने क्रिकेटला आणि धोनीतील खेळाडूला खूप चांगला न्याय दिला असं म्हणाव लागेल.
तर सांगण्याची गोष्टं अशी की खेळ विषय असला की चित्रपट बघताना ‘विलिंग सस्पेंशन ऑफ डिसबिलीफ’ म्हणजे पडद्यावर जे चाललय ते तात्पुरतं खरं खरं मानायचं असं माझ्याकडून काही होत नाही. म्हणून ‘दंगल’ सिनेमालासुद्धा नुसत्या लोकांच्या फीडबॅकवर भरवसा ठेऊन जावे का, असा प्रश्न होता. पण आमीर खानमधल्या परफेक्शनिस्टवर विश्वास ठेऊन गेलो आणि एक तृप्तीचा अनुभव घेऊन आलो.
आमिर खान आणि दोन मुलींनी खेळलेली कुस्ती ही खूप सराव करुन अफलातून वास्तववादी दाखवली आहे. सर्वानी कुस्तीचा खरा खरा अनुभव दिला आहे. कुस्तीचे सर्व डाव, हालचाली,पकडी या इतक्या वास्तववादी आहेत की प्रेक्षक उत्कंठेपोटी पायाने जमीन आणि हाताने खुर्ची घट्ट धरून ठेवतो. खेळात एक प्रसिद्ध वाक्य आहे ‘वन्स अ स्पोर्टसमन ऑलवेज अ स्पोर्टसमन’. या वाक्याला जगणारा आमिरचा महावीर फोगाट आहे. तो कितीही वयस्कर झाला तरी खेळाडू सारखाच चालतो. गावाला जाताना एयर बॅगच नेतो. जिंकणे खूप शालीनतेने पचवतो, पराजयातून स्फूर्ती घेतो, अत्यानंदाच्या क्षणाला सुद्धा स्थित:प्रज्ञ राहतो. (अगदी सचिन, द्रविड, धोनीसारखा)
चित्रपटात दाखवलेला प्रशिक्षणाच्या आधुनिक विरुद्ध पारंपारिक पद्धतीतील संघर्षसुद्धा अनेक खेळांमध्ये आज देखील विद्यमान आहे. उदाहरणार्थ हॉकीमध्ये अजूनही आपल्याला सुवर्णकाळ दाखवलेल्या माजी खेळाडूंना पारंपारिक कलात्मक हॉकीच (ध्यानचंद, अस्लमशेर खान, शहीद, धनराज, जफर इक्बाल खेळायचे ती) भारताला सन्मान प्राप्त करुन देईल, असे वाटते तर परदेशी प्रशिक्षक छोट्या पासेसवर खेळल्या जाणाऱ्या आधुनिक टोटल हॉकीवर विश्वास ठेवतात. कोचिंगच्या क्षेत्रात चालणारे हे प्रवाह चित्रपटात शास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत वास्तववादी दाखवले आहेत हे खूप समाधान देणारे आहे. सर्वांच्या भूमिका सुंदर झाल्या आहेतच पण आमिर लक्षात राहतो तो महावीर फोगाट म्हणून. हीरो आमिर खान म्हणून नाही. व्यक्तिरेखेचे सोने करणे म्हणजे आमिरने साकारलेला महावीर फोगाट. भविष्यात त्याला आमिर खान फोगाट असे ओळखले गेले तरी आश्चर्य नको.
हरियानाच्या कपिल देव, कल्पना चावला, युवराज सिंह यांच्या प्रमाणेच फोगाट परिवाराच्या पराक्रमाचे संपूर्ण भारताला एका सर्वांगसुंदर चित्रपटाच्या माध्यमातून स्मरण करुन दिल्या बद्दल आमिर खान आणि त्याच्या टीम चे लक्ष लक्ष आभार.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com