बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या नायक-नायिकांचे चित्रपटात शुभमंगल होऊन चित्रपटाचा ‘दी एण्ड’ होतो. पडद्यावरील काही नायक-नायिका वास्तव जीवनातही ‘शुभमंगल’ करतात. काही जोडय़ांचे हे शुभमंगल दीर्घकाळ टिकते तर काहीं जोडय़ांच्या बाबतीत ते ‘औटघटकेचे’ ठरते. अलीकडेच बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींचे शुभमंगल झाले असून काहींचे वर संशोधन सुरु आहे. पूर्वीच्या काळी बहुतांश लग्नं ही अगदी लहान वयातच होत असत. नंतरच्या काही वर्षांत मुलीच्या लग्नाचे वय सरासरी २२ ते २४ पर्यंत गेले आणि आता उच्च शिक्षण, नोकरी आणि करिअरमुळे ते २५ ते ३० पर्यंत किंवा त्या ही पुढे गेले आहे. अर्थात हे सर्वसामान्यांच्या बाबतीत झाले.
बॉलीवूडमधील सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. बॉलीवूडच्या काही नायिका वय उलटून गेले तरी लग्न करत नाहीत, काही जणी वय उलटल्यानंतर लग्न करतात, काहीतर लहान वयातच ‘शुभमंगल’ करून टाकतात. तर काही जणी आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या मुलाशी लग्न करतात. ऊर्मिला मातोंडकर, प्रीती िझटा यांनी अलीकडेच त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांशी लग्न केले. लग्नाच्या वेळी या दोघींचेही वय जास्त होते. म्हटले तर लग्नाचे वय उलटून गेलेले होते. वाढत्या वयात लग्न केलेल्या ‘या’ नायिकांपेक्षा लहान वयात लग्न केलेल्या बॉलीवूडच्या ‘त्या’ नायिकांना ‘बालिका वधू’च म्हणावे लागेल.
बॉलीवूडची ‘रंगीला’गर्ल ऊर्मिला मातोंडकर हिने नुकतेच तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या मोहसीन अख्तर मीर या व्यावसायिकाशी लग्न केले. तर तिच्या अगोदर अभिनेत्री प्रीती झिंटानेही तिच्यापेक्षा लहान असलेल्या जेन गुडईन फशी या अमेरिकन मित्राबरोबर लग्न केले. लग्नाच्या वेळी ऊर्मिलाचे वय ४२ होते. पण बॉलीवूडच्या इतिहासावर सहज नजर टाकली तर लग्नाच्या वेळी बॉलीवूडच्या या नायिकांचे वय कमी होते, अशीही काही उदाहरणे पाहायला मिळतात. वय वर्षे १८ ते २५ किंवा २७ या वयात त्यांनी ‘दोनाचे चार हात’ केलेले दिसते. लग्न करत असताना यापैकी काही जणींनी बॉलीवूडमध्ये पदार्पणातच आपले बस्तान बसविलेले होते. लग्न झाल्यानंतर त्याचा चित्रपट किंवा अभिनय कारकीर्दीवर काय परिणाम होईल याचा विचार न करता त्यांनी ‘आले मना मी करून टाकते लग्ना’ असे पाहायला मिळते.
लहान वयात लग्न केलेल्या अभिनेत्रींमध्ये ठळकपणे समोर येणारे नाव म्हणजे अभिनेत्री डिम्पल. डिम्पलने राजेश खन्नाशी लग्न केले तेव्हा तो बॉलीवूडचा सुपरस्टार होता तर डिम्पलची ‘बॉबी’पासून अभिनय कारकीर्द सुरू झाली होती. या लग्नाच्या वेळी डिम्पल अवघी १७ वर्षांची होती. डिम्पल व राजेश खन्ना यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या वयात थोडेथोडके नव्हे तर तब्बल १७ वर्षांचे अंतर होते. पण प्रेमात सर्व काही क्षम्य आहे, असे म्हणतात. डिम्पल आणि राजेश खन्ना यांचे लग्न त्या वेळी खूप गाजले होते. बॉलीवूडचा ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीपकुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांचेही लग्न त्या काळी गाजले. कारण लग्नाच्या वेळी दिलीपकुमारपेक्षा सायरा बानूचे वय खूपच कमी होते. पण तरीही त्यांचे लग्न झाले आणि ते ‘शुभमंगल’ आजपर्यंत टिकून आहे. बॉलीवूडची ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारी आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांची लग्नही त्या काळी गाजले. १९५२ मध्ये या दोघांनी लग्न केले. लग्नाच्या वेळी मीनाकुमारीचे वय फक्त २१ होते. लग्नानंतर १४ वर्षांनी दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.
बॉलीवूडची अभिनेत्री दिव्या भारती हिचे अकाली निधन झाले. मोजकेच चित्रपट केलेल्या दिव्या भारतीने तरुणांच्या मनावर काही काळ अधिराज्यही गाजविले. दिव्या भारतीने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी निर्माता-दिग्दर्शक साजिद नडियाडवाला यांच्याशी लग्न केले. या दोघांची ओळख ‘शोला और शबनम’या चित्रपटाच्या चित्रीकरणप्रसंगी झाली होती. १० मे १९९२ रोजी या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या दहा-अकरा महिन्यात तिचा मृत्यू झाला. दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा होती.
बॉलीवूडचा तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून ज्याची ओळख आहे त्या रणबीर कपूरचे आई-बाबा अर्थात नितू सिंह व ऋषी कपूर हेही याच क्षेत्रातील. दोघांचाही प्रेमविवाह. ‘जहरिला इन्सान’या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि लग्नात झाले. १९८० मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या वेळी नितू सिंहचे वय २१ होते. अभिनेत्री आयेशा टकिया आणि फरहान आझमी (समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांचा मुलगा) यांचे लग्न झाले तेव्हा आयेशाचे वय २३ इतके होते. दोघे जण लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते, मित्र होते.
बॉलीवूड ‘खान’दानातील एक सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन या दोघांचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट त्या काळी खूप गाजला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ‘हिट’ म्हणून गणला गेला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतरही भाग्यश्रीने तिचा बालपणीचा मित्र हिमालय दासानी याच्याशी लग्न केले आणि चित्रपट संन्यास घेतला. पण प्रेक्षक अद्यापही भाग्यश्रीला अद्यापही विसरलेले नाहीत. भाग्यश्रीचे लग्नाच्या वेळी वय २१ होते. ‘ही मॅन’ धर्मेद्र ‘ड्रीम गर्ल’ हेमामलिनी तसेच अमिताभ बच्चन व जया भादुरी यांचेही लग्न गाजले. बॉलीवूडची लग्ने किती टिकतात किंवा किती मोडतात हा वेगळा विषय आहे. रुपेरी पडद्यावर गाजलेल्या काही जोडय़ांचे वास्तवातही लग्न झाले ते दीर्घकाळ टिकले तर काही जणांचे मोडले. काहींनी लग्न मोडल्यानंतर पुन्हा दुसऱ्याबरोबर लग्न केले. काहींनी केलेच नाही. ‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ असे म्हटले जाते. असे असले तरी बॉलीवूडच्या लग्नाचा हा एकूणच प्रवास मनोरंजक आहे.