अभिनेता अक्षय कुमार नेहमीच विविध धाटणीच्या चित्रपटांना प्राधान्य देतो. याचीच प्रचिती गेल्या वर्षभरात प्रेक्षकांना आली असावी. ‘रुस्तम’, ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा खिलाडी कुमार लवकरच ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छ भारत अभियानाला नजरेत घेत महत्त्वाच्या मुद्द्यावर या चित्रपटाद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे. खिलाडी कुमारच्या याच चित्रपटाच्या चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. पण, सोशल मीडियावर मात्र या चित्रपटाविषयीचा एक फोटो व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी कमेंट करत चित्रपटाची खिल्लीही उडवली आहे.
‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या पोस्टवरच एक व्यक्ती लघुशंका करतानाचा हा फोटो सोशल मीडियावर अनेकांनीच शेअर केला. एकीकडे स्वच्छता, शौचालय यांचं महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चित्रपटाच्या निर्माता- दिग्दर्शकांचा आणि कलाकारांचा आटापिटा सुरु असतानाच हा विचित्र फोटो चर्चेचा विषय ठरतोय.
Practical Promotion. #ToiletEkPremKatha pic.twitter.com/ET6lWfLdmS
— Godman Chikna (@Madan_Chikna) August 8, 2017
Shortest review ever. pic.twitter.com/SiKCtNXM8h
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) August 8, 2017
ट्विटरवरही बऱ्याच युजर्सनी त्यांची कलात्मकता दाखवत फार कमी शब्दांत कमेंट्स केल्या आहेत. या उपरोधिक कमेंट्स पाहता खिलाडी कुमारची यावर काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वी खिलाडी कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर हा चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला आहे. सेन्सॉरने चित्रपटातील काही संवादांवर कात्री चालवल्याची माहितीसुद्धा मिळाली होती. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये सेन्सॉरने केलेली ही लुडबूड अनेकांनाच खटकली असल्याचंही पाहायला मिळत आहे.
वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या