दिल्लीतील सर्वसामान्य मुलगा ते बॉलिवूडचा किंग असा शाहरुख खानचा प्रवास फारच रंजक होता. प्रत्येक आव्हानाला तोंड देत या अभिनेत्याने आज त्याचं स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं आहे. जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त काळ हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तत्पर असणाऱ्या शाहरुखच्या चाहत्यांच्या आकड्यातही वर्षानुवर्षे वाढ होत आहे. पण, आता मात्र ‘किंग खान’चा हा प्रेक्षकवर्ग विभागला जाऊ शकतो असंच चित्र आहे. अर्थात शाहरुखचा प्रेक्षकवर्ग विभागला जात आहे तो त्याचा छोटा मुलगा अब्राममुळे.

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारा शाहरुख नेहमीच त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. त्यातही गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो अब्रामचे बरेच फोटो शेअर करतोय. अब्रामचे हे फोटो पाहता शाहरुख आणि त्याच्या दिसण्यामध्ये बरंच साम्य असल्यामुळे अनेकांनीच त्या दोघांमध्ये तुलना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इतक्या कमी वयात अब्रामही त्याच्या सुपरस्टार बाबांप्रमाणेच जणू काही चाहत्यांचं प्रेम अनुभवत आहे. शाहरुखचा वारसा त्याचा हा ‘लिटील सुपरस्टार’ पुढे चालवणार असं म्हणायला हरकत नाही. नुकताच शाहरुखने अब्रामचा एक फोटो पोस्ट केला आहे.

वाचा : …या सेलिब्रिटींच ‘शुभमंगल’ कधी?

ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये एका बाजूला शाहरुख दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला अब्राम. या दोघांचेही चेहरे आणि डोळ्यातील चमक पाहता दोन्ही फोटोंमध्ये बरंच साम्य असल्याचं लक्षात येतंय. किंग खानच्या एका फॅन पेजवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आल्याचं कळतं. हा फोटो शाहरुखलाही इतका आवडला, की त्याने थेट तो स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत त्यासोबत एक कॅप्शनही लिहिलं आहे. चाहत्यांचं किंग खानवर आणि त्याच्या कुटुंबियांवर असणारं प्रेम या फोटोतूनही व्यक्त होत आहे. दरम्यान, अब्राम आणि स्वत:मध्ये तुलना करणारा हा फोटो शाहरुखला आवडला यात शंकाच नाही. त्याच्या या फोटोवर बऱ्याचजणांनी कमेंट केली असून, तो फोटो शेअर आणि रिपोस्टही केला जात आहे.