Manoj Bajpayee Praises Bhau Kadam : ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधून आपल्या निरागस हास्याने सर्वांचे मनोरंजन करणारा विनोदी अभिनेता म्हणून भाऊ कदम यांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे. ‘चला हवा येऊ द्या’शिवाय ‘टाइमपास’, ‘हाफ तिकीट’, ‘नशीबवान’, ‘सायकल’, ‘घे डबल’, ‘व्हीआयपी गाढव’, ‘पांडू’ अशा अनेक चित्रपटांतही भाऊ कदम झळकले आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ या शोने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. या शोमध्ये भाऊ कदम यांनी नानाविध भूमिका साकारल्या आहेत आणि या शोमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. आपल्या अभिनयमुळे भाऊ कदम यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. जगभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये एका बॉलीवूड अभिनेत्याचाही सहभाग आहे, हा अभिनेता म्हणजे मनोज बाजपेयी.
बॉलीवूड चित्रपटसृष्टीसह ओटीटी विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारे मनोज बाजपेयी हे स्वत: भाऊ कदम यांचे चाहते आणि याबद्दल त्यांनी स्वत:च सांगितलं आहे. भाऊ कदम आणि मनोज बाजपेयी नुकत्याच आलेल्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या सिनेमात एकत्र झळकले आहेत. याच सिनेमाच्या निमित्ताने एबीपी माझा बरोबरच्या संवादात मनोज बाजपेयींनी भाऊ कदम यांचं कौतुक केलं आहे.
यावेळी मनोज बाजपेयी म्हणाले, “भाऊ कदम यांना मी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये पाहिलं होतं. भाऊ कदम यांच्याकडून मी खूप काही शिकलो. ते या सिनेमानिमित्त सतत आमच्याबरोबर होते. भाऊ कदम हे कायमच शांत दिसतात, काही बोलत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की, त्यांची काही तयारी नसेल. पण भाऊ कदम हा असा अभिनय आहे, जो जितका वेळ शूटिंग करत असतो; तितका वेळ त्याचं डोकं सतत चालू असतं.”
यापुढे ते कौतुक करत म्हणात, “भाऊ कदम एकाच संवादाचे अनेक प्रकार आपल्या डोक्यात तयार करत असतात. ते इतके शांत असतात की, त्यांच्या आजूबाजूला कोणालाच कळणार नाही की, भाऊ कदम काय करत आहेत. अनेकांना वाटतं की, तो येतो आणि बोलतो. पण असं नाही… तो माणूस खूप विचार करत असतो.”
भाऊ कदम इन्स्टाग्राम
यानंतर मनोज बाजपेयी म्हणाले, “मी कधीकधी सीनबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करायचो, तेव्हा ते त्यांची मतं व्यक्त करायचे. तेव्हा मला जाणवलं की या माणसाचा भूमिकेबद्दलचा किती अभ्यास आहे. ते सतत विचार करत असतात. त्यामुळे भाऊ कदम येऊन उभे जरी राहिले तरी लाफ्टर येतो, त्याचं कारण त्यांचा अभ्यास आहे. ते एक अभिनेता म्हणून खूपच हुशार आहेत.”
दरम्यान, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘इन्स्पेक्टर झेंडे’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या सिनेमात भाऊ कदम आणि मनोज बाजपेयी यांच्यासह सचिन खेडेकर आणि गिरीजा ओक, ओंकार राऊत, हरीश दुधाडे, वैभव मांगले असे दमदार कलाकार आहेत. यात भाऊ कदम यांनी भूमिकेतील साधेपणा आणि सहजता टीकवून पोलिसाची भूमिका अगदी चोख पार पाडली आहे.