बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचीच चलती पाहायला मिळत आहे. एखादा खेळाडू म्हणू नका किंवा मग कोणता कलाकार. अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट साकारण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. यातच आता आणखी एका बहुप्रतिक्षित चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. तो चित्रपट म्हणजे ‘संजू’. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाची बी- टाऊनमध्ये बरीच हवा पाहायला मिळत आहे. पण, सध्या या चित्रपटातील कलाकार मात्र त्यांच्या या आगामी कलाकृतीबद्दल फार माहिती देत नसल्याचं स्पष्ट होत आहे. असं करण्यामागेही काही कारणं आहेत.
अभिनेत्री सोनम कपूरनेच याविषयीचा उलगडा केला. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये सध्या सोनम व्यग्र आहे. त्यानिमित्ताने ती विविध कार्यक्रमांमध्येही हजेरी लावत आहे. अशाच एका कार्यक्रमादरम्यान तिला ‘संजू’ या आगामी चित्रपटाविषयीही काही प्रश्न विचारण्यात आले. ज्याचं उत्तर देण्यास सोनमने नकार दिला. आपल्याला त्या चित्रपटाविषयी सध्यातरी फार माहिती देण्याची परवानगी नसल्याचं कारण देत तिने उत्तर देणं नाकारलं.
‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेला याविषयीचीच माहिती देत सोनम म्हणाली, ‘राजू सरांच्या (राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या) चित्रपटाविषयी सांगावं तर आम्ही एनडीए या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आम्हाला परवानगी मिळत नाही तोवर आम्ही त्या चित्रपटाविषयी फार काहीच माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे दुर्दैवाने आतातरी मी तुम्हाला त्याविषयी काहीच सांगू शकत नाही.’
वाचा : मेसेंजरपासून सुरु झालेल्या रिलेशनशिपमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीला गवसलं तिचं अस्तित्वं
‘संजू’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबतच परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, मनिषा कोईराला, विकी कौशल हे कलाकारही झळकणार आहेत. तेव्हा आता हा मल्टीस्टारर ‘संजू’ प्रेक्षकांना भावतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.