बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानचं मुंबईत ‘तोरी’ नावाचं प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये बॉलीवूडच्या अनेक कलाकार हजेरी लावत असतात. त्यामुळे हे रेस्टॉरंट कायमच चर्चेत असतं. या रेस्टॉरंटचे सह-संस्थापक अभयराज कोहली आहे आणि त्यांनी नुकतीच रेस्टॉरंटमधील कामकाजाबद्दल प्रतिक्रिया दिली.

यावेळी त्यांनी “आम्ही कायमच रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेची काळजी घेतो. मात्र, कधीमधी जेवणात एखादी माशी, कीटक किंवा केस दिसणं, हा या व्यवसायाचा एक भागच आहे” असं म्हटलं.

Pop Diaries या यूट्यूब चॅनलबरोबरच्या संभाषणात, अभयराज कोहली यांना रेस्टॉरंटमधील स्वच्छतेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “बरीच रेस्टॉरंट्स त्यांच्या स्वच्छतेकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. पण आमच्या रेस्टॉरंटमध्ये याबबात कायमच नीट काळजी घेतली जाते. फक्त स्वयंपाकघर किती स्वच्छ आहे, हे महत्त्वाचं नाही. जेवणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची योग्य काळजी घेणं. तसंच ते शिजवून ग्राहक खाईपर्यंतची योग्य प्रकारे काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ज्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.”

यापुढे ते सांगतात, “आमच्याकडे सुशी, साशिमी, सेव्हिचे यांसारखे पदार्थ असतात. यासाठी कच्च्या मांसाचा वापर होतो आणि असं मांस एका खास उपकरणात ठेवणं आवश्यक असतं, ज्याला ‘सुपरफ्रीझर’ म्हणतात. हा सुपरफ्रीझर -६० ते -७० डिग्री तापमानापर्यंत अन्न थंड करतं आणि त्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढत नाहीत. असं उपकरण अनेक रेस्टॉरंट्समध्ये नसतं. मोठ्या शहरांमध्ये हे उपकरण फार थोड्या रेस्टॉरंट्समध्ये आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे हे उपकरण नसेल, तर तुम्ही अशा प्रकारचं अन्न ग्राहकांना देऊ शकत नाही.”

यापुढे ते सांगतात, “रेस्टॉरंटमध्ये काही चुका होणं साहजिकच आहे आणि त्या या व्यवसायाचा एक भागच आहेत. कधी कधी जेवणात एखादी माशी, कीटक किंवा केस दिसणं ही सामान्य गोष्ट आहे. अशा गोष्टी तुमच्या घरी, ऑफिसमध्येही होत असतात. या गोष्टी न होणं पूर्णपणे कोणीही बदलू शकत नाही.”

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ‘तोरी’ रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर दिलं जात असल्याचे अनेक वृत्त समोर आले होते. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या पनीरला ‘बनावट’ म्हटलं होतं. ज्याची बरीच चर्चा झाली होती. ज्यामुळे ‘तोरी’ रेस्टॉरंटला मोठ्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. मात्र यामुळे रेस्टॉरंटला फायदाच झाला होता, असं स्टॉरंटचे मुख्य शेफ स्टीफन गडित यांनी म्हटलं होतं.