अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या आगामी ‘जंगली’ या चित्रपटाच्या सेटवर जखमी झाला होता. दुखापतीनंतर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. एक स्टंट करतेवेळी त्याच्या डोक्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर त्याच्या डोक्यावर पट्टी बांधून प्रथमोपचार देण्यात आल्यानंतर तात्काळ पुढील उपचारांसाठी डॉक्टरांकडे पाठवण्यात आलं.
विद्युतला दुखापत झाल्यानंतर चित्रपटाचं चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं. पण, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचं लक्षात येताच इतर कलाकारांच्या साथीने चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आलं. विद्युतला दुखापत झाल्याचं कळताच त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वाचावरण पाहायला मिळालं. या साऱ्याचा अंदाज येताच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ठिक असल्याचे सांगितले. त्याशिवाय माध्यमांशी संवाद साधताना स्टंट करताना संपूर्ण जबाबदारी ही एका कलाकाराची असल्याचं त्याने स्पष्ट केलं. ‘स्टंट परफॉर्म करत असताना त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या अॅक्शन स्टारची (कलाकाराची) असते. मला संकटांना सामोरं जाण्याची आणि आव्हानं पेलण्याची मुळीच भीती वाटत नाही’, असं तो म्हणाला.
वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण
I'm much better. Kickin it all the way! Once the bleeding stopped, we resumed our shoot that very same day! Thank you for all your love!!! #BornJunglee https://t.co/eRx7DrmEcr
— Vidyut Jammwal (@VidyutJammwal) February 9, 2018
वाचा : Padman Movie Review : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’
हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक चक रसेल यांनी ‘जंगली’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी आपल्यावर घेतली असून, या चित्रपटाच्या माध्यमातून विद्युत नव्या आणि अनपेक्षित रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विद्युतशिवाय या चित्रपटातून अभिनेता मकरंद देशपांडे आणि अतुल कुलकर्णीसुद्धा झळकणार असल्याचं कळतंय. या चित्रपटात माणूस आणि हत्ती यांच्यातील अनोखे नातेसंबंध दाखवण्यात येणार असून, विद्युत त्यात एका प्राणीप्रेमी व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.