Disha Patani : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीतील सिव्हिल लाईन्स परिसरातील घरावर ११ सप्टेंबर रोजी रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील दोन संशयित हल्लेखोरांचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने मंगळवारी गाझियाबादमधील ट्रोनिका सिटी परिसरात केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या चकमकीत दोन संशयितांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणात तुर्की बनावटीचं झिगाना आणि ग्लॉक असे दोन पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहेत. हे पिस्तूल तुर्की बनावटीचं असून पाकिस्तानी ड्रोनद्वारे त्याची तस्करी करण्यात आल्याचा संशय आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
पोलिसांनी याबाबत पुष्टी केली की गाझियाबादमधील चकमकीत मृत्यू झालेल्या अरुण आणि रवींद्र या दोन संशयित हल्लेखोरांकडे झिगाना आणि ग्लॉक असे दोन पिस्तूल आढळून आले. गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्य देखील अशा प्रकारचे पिस्तूलांना अधिक पसंती देतात अशी माहिती याआधीही समोर आलेली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की झिगाना पिस्तूल सामान्यतः पाकिस्तानातून ड्रोनद्वारे किंवा नेपाळमधून हवाई मालवाहू मार्गाने भारतात तस्करी केल्याचा संशय आहे.
नेमकं घटना काय घडली होती?
दिशा पटानीच्या घराबाहेर ११ सप्टेंबर रोजी रात्री गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत होते. पोलिसांनी मोटारसायकलवरून त्यांचा माग काढला आणि दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या चकमकीत दोन्ही गुन्हेगार गंभीर जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी एका निवेदनात दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
कोण आहेत हे आरोपी?
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन आरोपी जखमी झाले. रविंद्र आणि अरुण अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. दोघंही हरियाणाचे रहिवासी होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पिस्तुल, काडतुसं आणि दिशा पटानीच्या घराजवळ गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक जप्त केली आहे. दोन्ही आरोपींचे मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.