बॉलिवूड चित्रपटांमधून दिलखुलास आणि बेधडक भूमिका साकारणारी अभिनेत्री काजोल खऱ्या आयुष्यात मात्र काहीशी वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण, सोशल मीडियाविषयीच्या मतातूनच सर्वांसमोर आलं आहे. ती आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे नियमित संवाद साधण्यास फारशी प्राधान्य देत नाही. सोशल मीडियावर सक्रीय का नाही याचा खुलासा खुद्द काजोलनेच एका मुलाखतीत केला.
सोशल मीडियापासून चार हात लांब राहणाऱ्या काजोलला हे सर्व हाताळणं म्हणजे एक प्रकारचं ओझं वाटतं. आपण कधीही सोशल मीडियाच्या आहारी गेलो नव्हतो असे तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. याविषयी काजोल म्हणाली, ‘मला सोशल मीडिया अगदीच आवडत नाही असं नाही. पण, काही बाबतीत मला सोशल मीडिया खटकते. बऱ्याचदा तर मला ही एक प्रकारची जबाबदारी आणि ओझं वाटतं. बऱ्याचजणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांशी जोडलं जाणं आवडतं, पण मी त्यांच्यापैकी नाही.’
वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात
सोशल मीडियाचा वापर गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्याचं लक्षात आलं आहे. किंबहुना बरेच सेलिब्रिटीसुद्धा या माध्यमाचा वापर करत चाहत्यांसोबत एक प्रकारचं नातं जोडू पाहात आहेत. पण, काजोलचं एकंदर मत आणि सोशल मीडियाकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन पाहता या सर्व गोष्टींपासून दूर राहण्याकडेच तिचा कल असल्याचं स्पष्ट होतंय. ‘सोशल मीडिया बझ’, ‘ट्रोलिंग’, त्यावरुन निर्माण होणारे वाद आणि एकंदर त्यानंतर उदभवणारी परिस्थिती या कारणांमुळे तर ती सोशल मीडियापासून दूर राहत नसेल ना? असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करु लागला आहे. सर्वांची लाडकी काजोल या अनोख्या माध्यमाला इतकी का घाबरतेय आणि तिला या गोष्टीचं इतकं ओझं का वाटतंय यामागचं खरं कारण ती स्वत:च देऊ शकते.