‘तारे जमीन पर’ चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली टिस्का चोप्रा हे नावाजलेली अभिनेत्री आहे. साध्या भूमिकांबरोबच ती बोल्ड आणि धाडसी अशा भूमिकासुद्धा तितक्याच सहजतेने साकारते. चित्रपटाबरोबरच ती आता ओटीटी विश्वातही चांगलीच रुळली आहे. हॉटस्टारवर आलेल्या ‘हॉस्टेजेस’ या सीरिजनंतर टिस्का ही पुन्हा एकदा ‘दहन या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. ही सीरिजही हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून यामध्ये टिस्का एका महिला आयएएस अधिकारीची भूमिका निभावत आहे.
याच संदर्भात टिस्काने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव तसेच सध्या प्रेक्षकांची बदलत असलेली आवड याविषयी टिस्काने खुलासा केला आहे. सीरिजविषय बोलताना टिस्का म्हणाली, “मी दिग्दर्शकावर प्रचंड अवलंबून असते, काम उत्तम व्हावं यासाठी मी सतत दिग्दर्शकाच्या मागे लागते. या सीरिजमध्ये दिग्दर्शकाने मला सांगितलं की ही कथा विज्ञान आणि अंधश्रद्धा यामधील एक हलकी पुसटशी रेषा आहे त्यावर बेतलेली आहे. तेव्हा कुठे मी माझ्याकडून या भूमिकेला न्याय देऊ शकले.”
एकूणच सध्या मनोरंजनसृष्टीत आणि खासकरून ओटीटीवर महिला अभिनेत्री यांना चांगला वाव मिळत आहे. रविना टंडन, सुश्मिता सेन, माधुरी दीक्षित अशा दिग्गज अभिनेत्री काहीतरी वेगळं करू पाहत आहेत. याविषयी टिस्का म्हणाली, ” आर्या, अरण्यक, दिल्ली क्राइमसारख्या सीरिजना मिळालेलं यश अभूतपूर्व आहे. दहनसारखी वेबसीरिज निसर्ग मेहता आणि विक्रांत यांनी मिळून लिहिली आहे. दोघेही पुरुष आहेत पण त्यांनी स्त्रीपात्राला अत्यंत पॉवरफूल दाखवलं आहे. महिलांनी लेखनातही प्रगती करायला हवी, पण पुरुषांनी एखादं गुंतागुंतीचं महिलेचं पात्र लिहिणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे. असं आता होऊ लागलं आहे कारण पुरुष आता महिलांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहेत.”
आणखी वाचा : केआरकेला ‘आरएसएस’मध्ये यायचं आहे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवतांकडे केली विंनती
बॉलिवूड चित्रपटांची अधोगती आणि बॉयकॉट ट्रेंडयाविषयीसुद्धा टिस्काने तिचं मत मांडलं. ती म्हणाली, “अजूनही बरेच फिल्ममेकर्स चित्रपट उद्योगाकडे आर्थिक फायद्याच्या दृष्टीने बघत आहेत. बॉलिवूडचे चित्रपट एका ठराविक फॉर्म्युलामध्ये अडकला आहे. त्यामुळेच सध्याचे चित्रपट बघायला प्रेक्षक गर्दी करत नाहीत. अर्थात ही काही कायमची समस्या नाही, यातूनही आपण बाहेर पडू.” टिस्का चोप्राची ‘दहन’ ही वेबसिरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे, सस्पेन्स थ्रिलर अशी ही वेबसीरिज तुम्ही हॉटस्टार या ओटीटीप्लॅटफॉर्मवर पाहू शकता.