शाहरुख खान, सैफ अली खान या कलाकारांच्या कारकिर्दीला आता जवळपास बरीच वर्षे उलटून गेली असताना आता या कलाकारांची मुलं चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. सारा अली खान, इशान खत्तर, सुहाना आणि आर्यन खान या सेलिब्रिटी किड्सची चर्चा सुरु आहे. या चर्चेपासून दूर असलेला सेलिब्रिटी किड म्हणजे विनोदवीर जॉनी लिव्हरचा मुलगा जेसी लिव्हर. जेसीसुद्धा सध्या त्याच्या बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत असल्याचं वृत्त ‘बॉलिवूड भास्कर’ने प्रसिद्ध केलंय.
२७ वर्षांच्या म्युझिशियन जेसीला आता चित्रपटांसाठीच्या प्रस्तावांबद्दल विचारणा करण्यात येत आहे. पण, सध्यातरी त्याला हवी तशी भूमिका सापडली नाहीये. त्यामुळे चांगली भूमिका मिळत नाही तोवर जेसी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार नाहीये. सर्व कलाकारांची मुलं प्रकाशझोतात असताना जॉनी लिव्हरचा मुलगा चित्रपटसृष्टी आणि या झगमगाटापासून दूर का होता असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. खरंतर लहानपणीच जेसीला एक गंभीर आजार झाला होता. १२ वर्षांचा असताना जेसीच्या गळ्यात ट्युमर झाला होता. ज्यामुळे त्याला कर्करोगानं ग्रासलं. त्यानंतर परदेशात उपचार घेतल्यानंतर तो आता पूर्णपणे बरा झाला आहे.
वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…
या आजारातून पूर्णपणे सावरल्यानंतर जेसीने १२ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पण, त्यानंतर मात्र त्याने एकाएकी शिक्षणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या काळात बहिणीच्या म्हणजेच जेमीच्या करिअरला पाहून जेसीने पुन्हा एकदा शिक्षणाची वाट धरली. लंडनमध्ये जाऊन त्याने ‘ह्युमन रिसोर्सेस’ क्षेत्रातील उच्चशिक्षण पूर्ण केलं. त्यासोबतच अभिनय आणि संगीत क्षेत्रातही त्याने आपलं काम सुरु ठेवलं. जेमी एक चांगला ड्रमर असून, त्याचा स्वत:चा एक ‘म्युझिक ग्रुप’ही आहे. तेव्हा आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊ पाहणारा जेसी यशस्वी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.