सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये असणाऱ्या नात्याची व्याख्या सतत बदलत असते. त्यातही काही कलाकारांचे फॅन्स आणि त्यांची फॅनगिरी कित्येकदा मर्यादा ओलांडते. आपल्या आवडत्या कलाकाराच्या एण्ट्रीवर चित्रपटगृहांमध्ये टाळ्यांच्या कडकडाट होतो, शिट्ट्या वाजविल्या जातात, काही प्रेक्षक तर उत्साहाच्या भरात चक्क नाचू लागतात. आवडत्या कलाकाराविषयी प्रेम व्यक्त करण्याची ही प्रत्येकाची वेगळी पद्धत. पण, मालेगावमधील एका चित्रपटगृहामध्ये पुन्हा एकदा या सर्वाला शह देणारी एक विचित्र ‘फॅनमुमेंट’ पाहायला मिळाली.

अभिनेता सलमान खान आणि त्याच्या नावाभोवती असणारं वलय सर्वांनाच ठाऊक आहे. चाहत्यांचं या अभिनेत्याप्रती असणारं प्रेम तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण, सलमानप्रती असणारं वेड नेमकी काय असतं हे नुकतच पाहायला मिळालं. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचा शो सुरु असताना मालेगावच्या एका चित्रपटगृहात प्रेक्षकांनी चक्क फटाके फोडले. चालू चित्रपटामध्येच हा सर्व प्रकार घडल्यामुळे एकच गोंधळ उडाल्याचंही पाहायला मिळालं. काही प्रेक्षकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केला. पण, कालांतरने हा व्हिडिओ डिलीटही करण्यात आला आहे.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

हे सर्व गोंधळाचं वातावरण पाहता चित्रपटगृहाच्या मालकाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर फटाके फोडणाऱ्या अतिउत्साही चाहत्यांना अटक करण्यात आली आहे. काही प्रेक्षकांच्या अतिउत्साहीपणामुळे चित्रपटगृहातील इतर उपस्थितांनाही हा त्रास सहन सरावा लागला. सलमानच्या चाहत्यांचं त्याच्याप्रती असणारं वेड वगैरे सर्वकाही मान्य आहे. पण, उत्साहाच्या भरात घडणारे हे सर्व प्रकार आनंदी वातावरणाला कुठेतरी गालबोट लावत आहेत असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, ‘ट्युबलाइट’च्या कमाईचे आकडे संथ गतीने पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे भाईजानच्या ‘ट्युबलाइट’चा लख्ख प्रकाश पडलाच नाही असं मतही काहीजणांनी मांडलं आहे.