अभिनेता अनिल कपूर, येत्या काळात ‘फन्ने खान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला ज्यातून अनिल एका टॅक्सी चालकाच्या भूमिकेत झळकत असल्याचं पाहायला मिळालं. गायक होण्याचं स्वप्न पाहणारा तो टॅक्सी चालक स्वत:चं स्वप्न साकार करण्यात असमर्थ ठरतो, तरीही आपल्या मुलीला एक मोठं कलाकार बनवण्यासाठी त्याची धडपड सुरु असते.
‘फन्ने खान’मधील अनिल कपूर साकारत असलेल्या व्यक्तीरेखेबद्दल प्रेक्षकांमध्येही बरंच कुतूहल पाहायला मिळत आहे. मुळात तो साकारत असलेली ही व्यक्तीरेखा त्याच्या पदार्पणाच्या ‘वो सात दिन’ (१९८३) या चित्रपटातील भूमिकेशी बरीच मिळतीजुळती आहे. ‘वो सात दिन’मध्ये अनिल कपूरची व्यक्तीरेखा स्वत:पुरताच मर्यादित होती. पण, ‘फन्ने खान’मध्ये मात्र तो आपल्या मुलीवर जास्त लक्ष केंद्रित करताना दिसेल. त्यामुळे या एव्हरग्रीन अभिनेत्याचं हे रुप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का?
७३व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये नामांकन प्राप्त ‘एव्हरीबडीज फेमस’ या बेल्जियन चित्रपटाचा हा रिमेक आहे. पालकांच्या इच्छेखातर संगीत क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आलेल्या एका तरुणीचा प्रवास या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन आणि राजकुमार राव यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. ऐश्वर्या यात संगीत क्षेत्रातील एका लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारत आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अतुल मांजरेकरनं केलं आहे. ३ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.